भोपाळ वृत्तसंस्था । ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या कथित जमीन घोटाळ्याची नव्याने चौकशी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी ज्योतिरादित्य यांची फाईल पुन्हा उघडून त्यांची चौकशी करण्याची तयारी कमलनाथ सरकारने सुरू केली आहे. या प्रकरणी तक्रार करणार्या सुरेंद्र श्रीवास्तव यांनी आर्थिक गुन्हे शाखेला पत्र लिहून पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली. सुरेंद्र श्रीवास्तव यांनी भोपाळमधील आर्थिक गुन्हे विभागाच्या कार्यालयाला पत्र लिहिले आहे. जमीन घोटाळ्याची सत्यता समोर आणावी अशी मागणी श्रीवास्तव यांनी पत्राद्वारे केली आहे. ज्योतिरादित्य आणि त्यांच्या सहकार्यांनी १० हजार कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप सुरेंद्र श्रीवास्तव यांनी २०१४ मध्ये केला होता. या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली होती. नंतर ही चौकशी रोखण्यात आली. ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरेंद्र श्रीवास्तव यांनी पत्र लिहून आर्थिक गुन्हे विभागाकडे जमीन घोटाळ्याच्या चौकशी करण्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कमलनाथ सरकारने राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी कथित घोटाळ्याच्या चौकशीचे त्रांगडे त्यांच्या मागे लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.