मुंबई : वृत्तसंस्था । ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुन्हा हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
९८ वर्षीय दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.
दिलीप कुमार यांना काल श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.‘दिलीप कुमार यांना मंगळवारी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीप कुमार यांच्या वयाचा विचार करुन कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आज पुन्हा एकदा त्यांची प्रकृती तपासून कोणते उपचार करावेत याचा निर्णय घेतला जाईल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत. काळजी करण्याचे कारण नाही’ अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे.
यापूर्वी ६ जून रोजी दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा देखील त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांना बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. दरम्यान दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानो यांनी दिलीप कुमार लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी चाहत्यांना प्रार्थना करण्यास सांगितले होते. ११ जून रोजी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पण आता पुन्हा दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे चाहत्यांना चिंता वाटत आहे.