जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजीनगर हुडको परिसरात मागील वादाच्या कारणावरून तरुणाला लोखंडी कोयताने पायावर मारून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत रविवार १६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विकास मधुकर साळवे (वय 34) रा. गेंदालाल मिल, जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून पेंटरचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवार १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजीनगर हुडको परिसरातील रेशन दुकानाच्या ओट्यावर विकास साळवे बसलेला होता. त्यावेळी त्याच भागातील राहणारा श्रीकांत मोरे (पूर्ण नाव माहित नाही) हा येऊन विकास साळवे याला शिवीगाळ करून मारहाण केली तर त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने विकासच्या उजव्या पायावर मारून गंभीर दुखापत केली. दरम्यान जखमी अवस्थेत विकासला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबत रविवारी १६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात विकास साळवे यांच्या जबाबदावरून संशयित आरोपी श्रीकांत मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीसहेड कॉन्स्टेबल रवींद्र सोनार करीत आहे.