जि. प. सर्वसाधारण सभेत गट विकास अधिकारी गैरहजर – सदस्यांनी व्यक्त केली नाराजी

जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला गट विकास अधिकारी हजर नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असता सर्व गट विकास अधिकाऱ्यांची हजेरी घेण्यात आली. यात चाळीसगाव व जामनेर गट विकास अधिकारी गैरहजर तर पारोळा गट विकास अधिकारी हे आमदारांच्या बैठकीला हजर असल्याचे समोर आले.

 

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज सोमवार दि. ३ जानेवारी रोजी जि. प. अध्यक्षा ना. रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक सभेत जिल्हा परिषद सदस्य पोटतिडकीने विषय मांडत असतांना संबधित गट विकास अधिकारी बैठकीत हजर राहत नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. महत्वाचे विषय सभेत असतांना गट विकास अधिकारी गैरहजर राहतात कसे ? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. यावेळी जि. प. अध्यक्षा ना. रंजना पाटील यांनी गैरहजर गट विकास अधिकाऱ्यांना तत्काळ नोटीस बजावण्याचे आदेश दिलेत. तसेच महापालिका जिल्हा परिषदेकडून सक्तीने कर आकारणी करत असतांना महापालिका जिल्हा परिषदेची जागा वापरत असेल त्यांना नोटीस पाठवली का ? असा प्रश्न पोपट तात्या भोळे यांनी उपस्थित केला. याबाबत दोन महिन्यांपासून पत्र दिले असल्याची माहिती उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. लोखंडे यांनी सपष्ट केले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जळगाव गट विकास अधिकारी यांनी शुक्रवार पर्यंत याचा अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत.

Protected Content