जि.प. बांधकाम विभागातील कर्मचार्‍याची घरासमोरून दुचाकी लांबवली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाघुळदे नगरात प्रथमेश अपार्टमेंटजवळ जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचार्‍याची घरासमोर उभी दुचाकी लांबविल्याची घटना गुरुवारी समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वाघुळदे नगरातील प्रथमेश अपार्टमेंटजवळ मनोज रमेश पाटील (वय-४०) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. जळगाव जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात नोकरीला आहेत . २५ नोव्हेंबर रोजी दुपारी पाऊण वाजता मनोज पाटील हे नेहमीप्रमाणे जेवणासाठी घरी आले. यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी क्र. (एमएच १९ बीएक्स ०१२७) ही घरासमोर उभी केली. यानंतर मनोज पाटील हे अर्ध्या तासानंतर १ वाजुन १५ मिनिटांनी ऑफिसला जाण्यासाठी निघाले असता घरासमोर उभी केलेली दुचाकी आढळून आले नाही . सर्वत्र शोध घेतला असता दुचाकी मिळून न आल्याने मनोज पाटील यांनी याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास गणेश पाटील हे करीत आहेत.

Protected Content