जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात गत २४ तासांमध्ये ३२ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून याच कालावधीत ४१ जणांनी कोविड-१९ विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. यात जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये एकही रूग्ण आढळून आलेला नाही हे विशेष.
जिल्हा प्रशासनाने एका प्रेस नोटच्या माध्यमातून गत २४ तासांमधील कोरोनाच्या संसर्गाबाबत माहिती जाहीर केली आहे. यानुसार जिल्ह्यात ३२ बाधीत रूग्ण आढळून आले असून ४१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. विविध तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-१०; भुसावळ-९; अमळनेर-५; चोपडा-६ तर जामनेर-१ असे रूग्ण आढळून आले आहेत. अन्य १० तालुक्यांमध्ये कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही. तर आज दोन रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधीत रूग्णांची संख्या कमी आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांमध्येही हाच ट्रेंड दिसून आला आहे. यातील लक्षणीय बाब म्हणजे जिल्ह्यातील तब्बल १० तालुक्यांमध्ये निरंक स्थिती आढळून आलेली आहे.