जिल्ह्यात पाच तालुक्यांच्या ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणार

 

 

 

जळगाव : प्रतिनिधी ।  ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून पाच तालुक्यांच्या ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली  आहे.

 

कोरोनाची रूग्णसंख्या कमी होत असली तरी येत्या काही महिन्यांमध्ये कोविडची तिसरी लाट येण्याचा धोका आहे. यामुळे तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने प्रतिकारासाठी आतापासूनच  तयारी सुरू केली आहे. कोविडच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सीजनची गरज मोठ्या प्रमाणात लागली भविष्यात याची मागणी अजून वाढण्याची शक्यता आहे.

 

या अनुषंगाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आधीच जिल्ह्यात ठिकठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्लांट उभारण्यात येतील अशी घोषणा केली होती. या अनुषंगाने आता पारोळा कुटीर रूग्णालय, अमळनेर ग्रामीण रूग्णालय, भडगाव ग्रामीण रूग्णालय, धरणगाव ग्रामीण रूग्णालय आणि रावेर ग्रामीण रूग्णालय या पाच ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. हे प्रकल्प प्रत्येकी ३४० एलपीएम क्षमतेचे असून यातील प्रत्येक युनिटला ८० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पाच प्रकल्पांसाठी एकूण चार कोटी रूपयांच्या निधीला मान्यता देण्यात आलेली आहे.

 

वैद्यकीय उपचारांमध्ये ऑक्सीजन हा अतिशय महत्वाचा घटक आहे. सध्या पाचही ग्रामीण रूग्णालयांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू असले तरी भविष्यात कोविड आणि नॉन-कोविड या दोन्ही प्रकारातील रूग्णांच्या ऑक्सीजनची गरज हे प्लांट पूर्ण करणार आहेत. विशेष करून ग्रामीण रूग्णालयात अनेक महिलांना प्रसुतीकाळात ऑक्सीजनची आवश्यकता वाटते. त्यांच्यासाठी भविष्यात पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध राहणार आहे.

 

याआधी भुसावळचे ट्रॉमा केअर सेंटर, मुक्ताईनगरचे उपजिल्हा रूग्णालय, चोपडा येथील ग्रामीण रूग्णालय, जामनेरचे ग्रामीण रूग्णालय व मोहाडी येथील महिला हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन निर्मिती प्लांटचे काम सुरू झालेले आहे.  जिल्हा रूग्णालयात देखील ऑक्सीजनची स्वयंपूर्णता झालेली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये ऑक्सीजन निर्मिती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव जिल्हा हा ऑक्सीजनच्या दृष्टीने स्वयंपूर्ण बनविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून आम्ही यासाठी आधीच प्रयत्न सुरू केले आहेत. आता पाच तालुक्यांमध्ये ऑक्सीजन निर्मिती होणार असल्याने कोविड आणि नॉन-कोविड रूग्णांना याचा लाभ होणार आहे.  कोविडच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेचा जिल्हा प्रशासनाने चांगला प्रतिकार केला असून तिसरी लाट आली तरीही प्रशासनला सर्वतोपरी तयारी करून सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे   पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

 

Protected Content