जिल्ह्यात उद्यापासून सात केंद्रावर ‘कोविड 19’ लसीकरण मोहिमेस सुरवात (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात शनिवार 16 जानेवारी, 2021 पासून सात केंद्रावर कोविड-19 लसीकरण मोहिमेस सुरवात होणार असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक केंद्रावर 100 असे एकूण 700 आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांचेसह आयएमएचे प्रतिनिधी, आरोग्य यंत्रणेचे अधिकारी व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले की, जिल्ह्यात कोविड-19 लसीकरण मोहीम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव, म.न.पा अंतर्गत डी.बी.जैन हॉस्पीटल, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा आणि जामनेर तसेच ग्रामीण रुग्णालय, पारोळा व चाळीसगाव आणि न. पा. भुसावळ असे 7 केंद्रांवर राबविण्यात येईल. या मोहिमेसाठी प्रति लसीकरण केंद्र 100 लाभार्थी याप्रमाणे एकूण 700 आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. या लसीकरण मोहिमेसाठी जळगाव जिल्ह्यात एकूण 19 हजार 951 आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. त्यासाठी ‘कोविशील्ड’ या लसीचे 24 हजार 320 डोस (2432 Vial) जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत.

जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येणाऱ्या सात केंद्रांवर सर्व आवश्यक व्यवस्था सुसज्ज करण्यात आली आहे. नियुक्त कर्मचारी आणि लस टोचकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व केंद्रावर लसीकरणाबाबत माहिती अद्ययावत करण्यासाठी इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व बाबींची तपासणी आज करण्यात आली आहे. राष्ट्रीयस्तरावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोविड-19 लसीकरण मोहिमेचे उदघाटन झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेस सुरुवात होईल.

लसीकरणाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यत असणार आहे. लाभार्थींना शक्यतोवर लस दंडावर देण्यात येणार असल्याने त्याअनुषंगाने कपडे परिधान करावे. लाभार्थ्यांनी आपले नोंदणीच्या वेळी दिलेले ओळखपत्र व आधारकार्ड लसीकरणाच्या दिवशी सोबत आणावे. लाभार्थ्याचे लसीकरण कक्षात प्रवेश करण्यापुर्वी व्हॅक्सीनेशन ऑफिसर हात सॅनिटाईज करुन (हात धुणे), तापमान व ॲक्सीमिटरव्दारे ऑक्सीजनची पातळी तपासली जाईल. लाभार्थ्यांचे नाव यादीमध्ये तपासुन नंतर त्याला वेटींग रुममध्ये प्रवेश देण्यात येईल. व्हॅक्सीनेशन ऑफिसर 2 हा आलेल्या लाभार्थ्यांचे ओळखपत्र तपासेल व त्याची कोविन ॲपमध्ये पडताळणी करुन त्यानंतर लाभार्थीला लसीकरण कक्षात पाठवेल. लसीकरण कक्षात व्हॅक्सीनेटरमार्फत लाभार्थ्यांस इंजेक्शनव्दारे दंडात लस दिली जाईल. लाभार्थ्यास लस घेतल्यावर कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास आरोग्य केंद्र/कोरोना कंट्रोल रुम 0257-2226611 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. लाभार्थ्यांस जर काही त्रास झाला तर त्याठिकाणी उपचाराची आवश्यक साधनसामुग्रीची AEFI किटही उपलब्ध असेल. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने कोणीही चुकीची माहिती अथवा अफवा पसरवू नये. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच नागरीकांनीही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. कोणी चुकीची माहिती पसरवित असल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

https://www.facebook.com/508992935887325/videos/3731698306896656

Protected Content