बहुआयामी महासत्ता होण्याची भारताची क्षमता आहे – डॉ. ज्ञानेश्वर मुळे

जळगाव प्रतिनिधी । बहुआयामी महासत्ता होण्याची भारताची क्षमता आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि माजी सनदी अधिकारी व राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्वामी विवेकानंद जयंती निमित्त व्याख्यान देतांना केले.

विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने महासत्ता भारत: वर्तमान कि भविष्य या विषयावर श्री.मुळे यांचे व्याख्यान विद्यापीठात आयोजित करण्यात आले होते. डॉ. मुळे आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, भारत इतिहासातील एक महासत्ताच होता. केवळ आर्थिकच नव्हे तर जीवनाच्या विविध क्षेत्रात भारतीयांचे प्रभावी योगदान राहिले आहे. सद्यस्‍थितीत भारतीयांच्या कर्तृत्वाचा प्रभाव जगातील विविध देशांमध्ये दिसून येतो. क्षेत्रफळ, लोकसंख्या, सामाजिक सक्षमता या सर्व आपल्या जमेच्या बाजू आहेत. भारतीय संविधान आपणास महासत्ता कसं बनायचे याचे मार्गदर्शनही करते. स्वतंत्रता, समता, न्याय, व सुशासन या चतु:सूचीच्या आधारे भारतास वाटचाल करत रहावी लागेल.

डॉ.मुळे असेही म्हणाले की, भारतास महासत्ता बनायचे असेल तर केवळ सरकारने प्रयत्न करणे गरजेचे नसून त्यासाठी देशातील जनतेने पुढाकार घेण्याची गरज आहे. डॉ.मुळे यांनी सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण, जीडीपी, शिक्षण, आरोग्यसेवा, संशोधन, साक्षरता, मनुष्य विकास, लोकसंख्या नियंत्रण, युवकांचे कार्य, देशप्रेम, कर्तव्य अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी सांगितले की, भारतास जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर सर्वोतपरी प्रयत्न होणे गरजेचे असून त्यासाठी देशातील जनता व युवक वर्ग जागृत झाला पाहिजे. तसेच शैक्षणिक क्षेत्रासोबत विविध संशोधन करुन जास्तीत जास्त पेटंट मिळविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे तरच देश येणाऱ्या काळात जागतिक महासत्ता बनू शकतो. प्रास्ताविक विभागाचे प्रभारी संचालक डॉ.मनीष जोशी यांनी तर सुत्रसंचालन श्याम महाजन, परिचय विद्यार्थीनी शुभांगी केदार तर आभार सुभाष पवार यांनी मानले. या ऑनलाईन व्याख्यानासाठी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश जडे व समाधान अहिरे यांनी परीश्रम घेतले.

Protected Content