जळगाव प्रतिनिधी । डॉक्टर असल्याचे भासवून एका तरूणीला तपासत असतांनाच तिच्या वडीलांच्या लक्षात आल्यानंतर त्या ‘मुन्नाभाई’ला आज दुपारी नागरीकांनी चांगलाच चोप दिला. या बोगस डॉक्टरला जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावातील १७ वर्षाची मुलगी हिच्या पोटात दुखत होते त्यामुळे त्यांनी आज जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले होते. आज दुपारी २.३० ते २.४५ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी मुकेश चंद्रशेखर कदम रा. मोहाडी ता.जि.जळगाव हा वार्डात येवून आपण एमडी वैद्यकिय अधिकारी असल्याचे सांगून मुलीची टेटेस्कोपने तपासणी करू लागला यावर तरूणीचे वडील यांना शंका आल्याने त्यांनी वैद्यकिय महाविद्यालयातील नर्सला विचारले असता वैद्यकिय अधिकारी नसल्याचे सांगितले. यावेळी त्याच्या कडे इंजेक्शन देण्याचे ॲम्बुल देखील होते त्यांनी तत्काळ त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता संशयित आरोपी मुकेश कदमने पळ काढला. त्यांनी आरडाओरड केली असता काही तरूणांनी त्याला पकडून चांगलाच हातसफाई केली व वैद्यकिय महाविद्यालयाच्या पोलीस चौकीत असलेल्या पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान जिल्हा पेठ पोलीसांनी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात धाव घेवून संशयित आरोपी मुकेश कदम याला ताब्यात घेतले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.