जिल्हा परिषदेतील प्रभारी राज संपवा : महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाची मागणी

जळगाव, प्रतिनिधी  |  जळगाव जिल्हा परिषदेत अनेक अधिकाऱ्यांकडे इतर विभागाचा अतिरिक्त पदभार असल्याने मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असून प्रभारी राज संपविण्यात यावे अशी तक्रार महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने जिल्हा दौ-यावर आलेल्या पंचायत राज समितीकडे केली आहे.

पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ.संजय रायमुलकर यांची महाराष्ट्र जन क्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, भारत ससाणे, रमेश सोनवणे, चंदन बिऱ्हाडे, निलेश बोरा,अमोल कोल्हे आदींनी भेट घेऊन जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची तक्रार करून निवेदन सादर केले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ऑडिट होत असते.पण कामावर ऑडिटर प्रत्यक्षात जात नसून   कार्यालयात बसून एम.बी.ऑडिट करतात. यामुळे बांधकामात गैरप्रकार होऊन भ्रष्टाचारास चालना मिळाली आहे.बांधकाम विभागाचा पदभार प्रभारी स्वरूपात शाखा अभियंता पहात असून अशाच प्रकारे विविध विभागीय प्रभारी अधिकारी कारभार पाहत आहे,सिंचन विभागातील जलयुक्त शिवार योजनेमार्फत झालेल्या कामांची चौकशी व्हावी,पदोन्नती नाही व नवीन भरती नसल्याने प्रभारी अधिकारी करारी कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेत आहेत.यामुळे कामाचा दर्जा निकृष्ट होत असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. याकडे पंचायत राज समितीचे लक्ष वेधण्यात आले.  यावेळी जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभाराबाबत व प्रभारी राज ची चौकशी करण्याचे आश्वासन  पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ.संजय रायमुलकर यांनी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाला दिले.

 

Protected Content