जिल्हास्तरीय युवा संसदमध्ये हर्षल पाटील व गिरीष पाटील ठरले विजेते

 

जळगाव, प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राकडून आयोजित जिल्हास्तरीय युवा संसदचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव, बुलढाणा विभागासाठी ऑनलाईन पद्धतीने युवा संसद पार पडली. जळगाव जिल्ह्यातून हर्षल पाटील व गिरीष पाटील यांनी बाजी मारली.

तरुण, तरुणी, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसीत व्हावे, देशाच्या समाजकारणाचे महत्व त्यांना कळावे यासाठी केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्रामार्फत राष्ट्रीय युवा संसदचे आयोजन करण्यात येत असते. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी अगोदर जिल्हास्तर आणि राज्यस्तर आपली निवड होणे आवश्यक असते. जळगाव, बुलढाणा जिल्ह्याची युवा संसद दि.२८ रोजी ऑनलाईन पध्दतीने पार पडली.

जिल्हास्तर युवा संसदमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी ४ मिनीटे वेळ देण्यात आला होता. स्पर्धेसाठी सुचविलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० भारतातील शिक्षणाचे परिवर्तन करेल, उन्नत भारत अभियान – समुदायांची शक्ती मुक्त करणे आणि त्यांच्या उन्नतीसाठी तंत्रज्ञान वापरणे, नवीन सामान्य स्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्था अनलॉक करणे, शेतकर्‍यांसाठी वरदान – शून्य बजेट नैसर्गिक शेती या विषयावर विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सादरीकरण केले.

स्पर्धेत जळगाव जिल्हयातून ४२ तर बुलढाणा जिल्ह्यातील २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ.पंकजकुमार नन्नवरे, डॉ.राधेश्याम चौधरी, कॅप्टन मोहन कुलकर्णी, डॉ.दिनेश पाटील, विनोद ढगे, दीपक सपकाळे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समन्वयक जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर होते. कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी अजिंक्य गवळी यांनी मानले तर कार्यक्रमासाठी चेतन वाणी, आकाश धनगर, शाहरुख पिंजारी, रोहन अवचारे यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेतून जळगाव जिल्ह्यातून हर्षल प्रवीण पाटील व गिरीष घनश्याम पाटील आणि बुलढाणा जिल्ह्यातून अभिजीत अनिल खोडके व सलोनी संजय त्रिवेदी यांची निवड करण्यात आली असून ते राज्यस्तरीय स्पर्धेत ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.

राज्यस्तरीय युवा संसदमधून ३ विद्यार्थी देशस्तरावर सहभागी होण्यासाठी निवडले जातील. राज्यस्तरीय स्पर्धा दि.१ ते ५ जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. राष्ट्रीय युवा संसद दि.१२ आणि १३ जानेवारी रोजी संसद भवनाच्या मुख्य सभागृहात होणार आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवण, प्रवास भत्ता दिला जाणार असून विजेत्यांना प्रथम बक्षीस २ लाख, द्वितीय १.५ लाख, तृतीय बक्षीस १ लाख असणार आहे. असे नेहरू युवा केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.

Protected Content