कणकवली । दैनिक सामनामध्ये जाहिरात आली म्हणजे शिवसेना बदलली असे होत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नाणार प्रकरणी आपली भूमिका कायम असल्याचे आज संकेत दिले.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या पहिल्या पानावर नाणारची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर शिवसेनेनं नाणारवरून यू-टर्न घेतल्याची चर्चा कोकणात सुरू होती. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. येथील पत्रकार परिषदेत त्यांना जाहिरातीसंदर्भात विचारले असता, उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचं धोरण आणि निर्णय मी ठरवतो आणि ते सामनातून मांडले जातात. कोणताही जाहिरातदार सेनेची भूमिका ठरवत नाही. जाहिरात आली म्हणजे शिवसेना बदलली, असं होत नाही. अशा वेगवेगळ्या जाहिराती रोज येतात, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
दरम्यान, नाणार रिफायनरीच्या उभारणीत दीड लाख लोकांना रोजगार मिळेल. रिफायनरी कार्यान्वित झाल्यामुळे २० हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होईल. सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा मिळतील. यामुळे कोकणवासीयांचं स्थलांतर थांबेल, असा दावा आरआरपीसीएलनं सामनातून छापून आलेल्या जाहिरातीत केला होता. शिवसेनेनं याआधी सातत्यानं नाणार प्रकल्पाला विरोध केला होता. भाजपासोबत सत्तेत असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाणारविरोधात भूमिका घेतली होती. मात्र आता सत्तेत येताच शिवसेनेच्या मुखपत्राच्या पहिल्याच पानावर नाणारची जाहिरात आल्यानं कोकणात शिवसेनेबद्दल संभ्रम निर्माण झाला होता.