जामनेर प्रतिनिधी | शहरात घरोघरी जाऊन घंटागाडीद्वारे कचरा संकलन करणे व गटार साफ सफाई करणे या कामाचा मक्ता रद्द करून मक्तेदार याचे नाव काळ्या यादीत टाकण्यासाठी नगर परिषदेतर्फे सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती नगराध्यक्ष साधना महाजन यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.
जामनेर नगर परिषद हद्दीतील सर्व मालमत्ताधारकांकडून घरोघरी जाऊन घंटा गाडीद्वारे ओला व सुका कचरा संकलन करणे व शहरातील कचरा गोळा करून घनकचरा प्रकल्पावर वाहतूक करणे व जामनेर शहरातील हद्दीतील सर्व सांडपाणी गटारे साफ सफाई कचऱ्याचे डंपिंग प्रकल्प व वाहतूक करणे या कामासाठी वार्षिक निविदा मागवण्यात आली होती. यामध्ये स्वामी सर्विसेस पुणे यांचे निविदा सर्वात कमी दराची असल्याने त्यांना जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता घेऊन कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. मात्र, संबंधित मक्तेदार निविदेतील अटी व शर्ती प्रमाणे काम करीत नसल्यामुळे तसेच दररोज सर्व वॉर्डांमध्ये घरोघरी जाऊन घंटागाडीद्वारे ओला व सुका कचरा संकलन करून घनकचरा प्रकल्पावर वाहतूक केली जात नसल्याचे तसेच शहरातील सर्व सांडपाण्याच्या गटारीतील साफसफाई व गाळयुक्त कचऱ्याची वाहतूक दररोज होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी नगरपालिका व नगरसेवक यांच्याकडे केल्या होत्या.
या तक्रारीबाबत संबंधित मक्तेदार यास सुधारणा याबाबत वेळोवेळी लेखी सूचना देऊन सुद्धा कामात सुधारणा न झाल्यामुळे दि. १३ नोव्हेंबर रोजी नगरपालिकेने विशेष सभा घेऊन सदर मक्ता रद्द केलेला आहे. मक्तेदार यास काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे. या सभेला नगराध्यक्ष साधना महाजन, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका यांचा सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला आहे.