शिवसेनेशी उद्या चर्चा केल्यावर राज्यपालांची भेट घेणार – चव्हाण

prithiraj chavhan

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | काँग्रेस-राष्ट्रवादीची आजची बैठक संपली असून सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. उद्या आम्ही आमच्या निवडणुकीतील मित्रपक्षांशी चर्चा करू. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करूनच महाआघाडीची अंतिम घोषणा करू आणि त्यानंतरच राज्यपालांना भेटू, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीचे नवे सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसत आहे.

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील ६, जनपथ येथील निवासस्थानी कालपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुरू असलेली मॅरेथॉन बैठक आज अखेर संपली आहे. या बैठकीनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मीडियासमोर येऊन या बैठकीची माहिती दिली. आज दोन्ही काँग्रेसची दुसरी बैठक पार पडली. त्यात सर्व मुद्द्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. त्यामुळे आता आम्ही मुंबईकडे निघालो आहोत. उद्या मुंबईत गेल्यावर आमच्या आघाडीतील मित्र पक्षांशी चर्चा करू. त्यांना संपूर्ण तपशील दिला जाईल. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करू आणि नंतरच तिन्ही पक्ष मिळून अंतिम घोषणा करू. त्यानंतर राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेबाबतची पुढची कार्यवाही करण्यात येईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

उद्या मुंबईत दोन्ही काँग्रेसची शिवसेनेसोबत बैठक होणार आहे. त्यात महाआघाडीचा फॉर्म्युला ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर हा फॉर्म्युला कसा असेल ? किमान समान कार्यक्रम काय आहे, याची प्रसार माध्यमांना माहिती दिली जाईल. शिवसेनेसोबत चर्चा केल्यानंतरच तिन्ही पक्ष मीडियासमोर येऊन ही माहिती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीमधील चर्चेचे गुऱ्हाळ संपले असून राज्यात सत्तास्थापनेच्या दिशेने तिन्ही पक्षांची वेगाने हालचाल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार यांच्यासह काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश, केसी वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, नवाब मलिक आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.

Protected Content