मुंबई : वृत्तसंस्था । ओएनजीसीनं ११ मे रोजीच जहाजं, बोटी, तराफे किनाऱ्यावर येण्यास सांगितलं असताना अॅफकॉननं अॅफकॉनच्या शापूरजी पालनजी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना वाचवणारे राज्य सरकारमधले झारीतले शुक्राचार्य कोण?” असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
तौते चक्रीवादळात बॉम्बे हायजवळ अॅफकॉनचा पी-३०५ हा तेल उत्खनन करणारा तराफा बुडून मोठी जीवितहानी झाल्याची दुर्घटना घडली. आता या दुर्घटनेसाठी नेमकं जबाबदार कोण? याचा तपास सुरू झाला असताना राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी केल्यानंतर आता भाजपाकडून आमदार आशिष शेलार यांनी भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला आहे.
“चक्रीवादळाचा इशारा आला होता. ११ मे रोजी नोटिफिकेशन काढून सर्व यंत्रणांनी सर्व जहाज, बोटी, बार्ज परत आले पाहिजेत असे निर्देश दिले. तरी अॅफकॉनच्या या बार्जने समुद्रात राहण्याचा निर्णय का घेतला? १० मे रोजी त्यांनी ओएनजीसीला एक पत्र लिहिलं. त्यात “आम्हाला काम करायचं आहे, दुर्घटना घडली तर त्याचं इंडेम्निफिकेशन देतो आहोत”, असं म्हटलं आहे. हा निर्णय कॅप्टन नाकेश यांनी एकट्याने घेतला होता का? १२ मे रोजी अॅफकॉनने ओएनजीसीला पत्र लिहून सांगितलं की १५ मेपूर्वी सगळ्यांना परत येण्याबाबत सांगितलं असलं, तरी आम्हाला १५ जूनपर्यंत काम करण्याची परवानगी द्या. यलोगेट पोलीस अॅफकॉनच्या निर्णयासाठी कॅप्टन राकेश यांना जबाबदार का धरत आहे? ओएनजीसीनं अॅफकॉनच्या बार्जला पास दिला नाही. नेव्हल सेक्युरिटी क्लिअरन्स नौदल अधिकाऱ्यांनी दिलंच नाही. त्यामुळे ओएनजीसीनं यांना कोणतीही परवानगी दिलेली नाही”, असा दावा आशिष शेलार यांनी यावेळी केला.
या मुद्द्यावरून राज्य सरकार राजकारण करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी यावेळी केला. “काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. एवढी घाई कशाची आहे? प्रत्येक गोष्टीत राजकारणाची भूमिका घेऊन आपण विषय सोडत आहोत का? सत्य बाहेर येण्यापासून वाचवत आहोत का? हा प्रश्न निर्माण होतोय. यलोगेट पोलीस स्टेशनमध्ये कॅप्टन राकेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी यलोगेट पोलीस स्टेशनमध्ये जो एफआयआर नोंदवला, त्यातून पोलीस आणि राज्य सरकार गुन्हेगारांना वाचवणे, चौकशी भलतीकडे नेणे आणि मृत्यूमुखी पडलेल्यांना न्याय मिळण्यापासून वंचित ठेवणे असं काम करत आहेत”, असं ते म्हणाले.
राज्य सरकार अॅफकॉनला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील आशिष शेलार यांनी केला. “अॅफकॉननं घेतलेला निर्णय कॅप्टन राकेश यांच्यावर फोडून अॅफकॉनला वाचवण्याचा प्रकार राज्य सरकार करतंय. राज्य सरकारचे मंत्रीच राजीनाम्याची मागणी करून राजकारण करतात. यलोगेटला कॅप्टन राकेश यांच्यावर गुन्हा दाखल होतो. पण दुर्दैवाने कॅप्टन राकेश अजूनही सापडलेले नाहीत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास भटकवायचा आणि अॅफकॉनच्या शापूरजी पालनजींना वाचवायचं, असा खेळ खेळणारा राज्य सरकारमधला झारीतला शुक्राचार्य कोण? असा आमचा प्रश्न आहे. अॅफकॉनच्या पदाधिकाऱ्यांना वाचवण्याची भूमिका पोलिसांनी का घेतली?”, असा सवाल देखील आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
“ही पूर्णपणे मानवनिर्मित दुर्घटना असून त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा”, अशी मागणी शुक्रवारी काँग्रेसकडून पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ” इतकं मोठं वादळ येत आहे हे सगळ्या देशाला माहिती होतं. मग ओएनजीसीला हे माहिती नव्हतं का? बार्जवर काम करणाऱ्यांचेही जीव आहेत ना? ओएनजीसीचे संचालक, सीएमडी यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल व्हायला हवा. हा हत्येचा गुन्हा आहे. सदोष मनुष्वधाचा गुन्हा आहे”, अशा शब्दांत ओएनजीसीला लक्ष्य केलं होतं. आशिष शेलार यांनी मात्र बोलताना ओएनजीसीनं इशारा दिला होता, पण अॅफकॉननंच काम करण्याचा निर्णय घेतला, अशी भूमिका मांडली आहे.