जळगाव शहरवासियांनी १७ मे पर्यंत जनता कर्फ्यु पाळावा ; महापौर भारती सोनवणे यांचे आवाहन

 

जळगाव (प्रतिनिधी) शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून नागरिकांनी स्वतःच गांभीर्य ओळखून खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शहराला कोरोनाचा विळखा घट्ट बसत आहे. कोरोनाला वेळीच आळा घालण्यासाठी जळगाव शहरवासियांनी १७ मे पर्यंत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन महापौर भारतीताई सोनवणे यांनी केले आहे.

 

जळगाव शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेतली गेली होती. कोरोनाचा एक रुग्ण बरा होऊन घरी गेला तर एकाचा मृत्यू झाल्याने शहर कोरोनामुक्त झाल्याचे समाधान लाभले होते. परंतु गेल्या पंधरा दिवसात चक्क १५ पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहराच्या विविध भागात आढळून आले असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

 

जळगावकरांनो घरातच रहा, प्रशासनाला सहकार्य करा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी १७ मे पर्यंत घरातच राहून खबरदारी घेणे गरजेचे आहे. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. मनपा प्रशासनाकडून शहराच्या विविध प्रभागात जाऊन सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. नागरिकांनी पथकाला योग्य आणि खरी माहिती देऊन सहकार्य करावे, जेणेकरून प्रशासन अधिक सतर्कता घेईल. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी कोरोना रुग्ण असलेल्या तालुक्यात १७ मे पर्यंत पुन्हा सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. जीवनावश्यक वस्तूंचा साठा प्रत्येकाच्या घरात असून दररोज भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन महापौर सौ.भारती सोनवणे यांनी केले आहे.

 

आपणच आहोत, आपल्या शहराचे रक्षक


शहरातील बहुतांश नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य अद्याप कळलेले नाही विशेषतः दाट वस्तीच्या परिसरात हे प्रमाण अधिक आहे. कोरोनाला जळगाव शहरातून हद्दपार करण्यासाठी आपणच स्वतःचे आणि परिसरातील नागरिकांचे रक्षक होणे आवश्यक आहे. शहरात त्या-त्या प्रभागात सर्व जाती, पंथ, भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, रिपाई यांच्यासह इतर राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सार्वजनिक गणेश महामंडळ, बजरंग दल, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी आपापल्या परिसरात कोरोना योद्धा म्हणून भुमिका बजावणे गरजेचे आहे. नागरिकांनी जनता कर्फ्युचे पालन करावे यासाठी त्यांनी त्यांच्या परीने आवाहन करावे. माध्यमांनी एक विशिष्ट जागा किंवा स्लॉट कोरोना जनजागृतीसाठी निश्चित करावा. आपल्या परिसरातील विशेषतः कॅन्टोनमेंट झोन मधील नागरिकांना घरात थांबायला लावणे, मास्क तयार करणे, आरोग्य सेतू अँप डाउनलोड करायला लावणे यासाठी आपण कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजवावे, असे आवाहन महापौर सौ.भारती कैलास सोनवणे यांनी केले आहे.

 

३०० वर व्यक्तींशी साधला संवाद

जळगाव शहर सुरक्षीत ठेवणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्रत्येकाने आपापल्या परिसरात आणि परिचयातील व्यक्तींना आपल्या परीने जनता कर्फ्युचे पालन करण्याचे आवाहन करावे यासाठी महापौर सौ.भारती सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी दिवसभरात तब्बल ३०० पेक्षा अधिक व्यक्तींशी मोबाईलद्वारे संवाद साधला. नागरिकांनी महापौरांच्या उपक्रमाचे कौतुक करीत त्यास प्रतिसाद देण्याचे सांगितले.

 

महापौरांना विविध स्तरातून स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद


महापौर सौ.भारती सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी जळगावातील नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला.

 

प्रत्येक प्रभागातून १०-१० स्वयंसेवकांनी पुढे यावे

जळगाव शहर सुरक्षीत ठेवणे आपलीच जबाबदारी आहे. आम्ही सार्वजनिक गणेश महामंडळाच्या वतीने गणेश मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांना नागरिकांना आवाहन केले आहे. प्रत्येक परिसरात १०-१० लोकांनी समोर येऊन पुढाकार घेणे आवश्यक आहे परंतु कुणीही धजावत नाही. तरीही आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत, असे सार्वजनिक गणेश महामंडळाचे सचिन नारळे यांनी सांगितले.

 

धोका वाढला, भीती घटली हे घातक


जळगाव शहरात गेल्या १५ दिवसापूर्वी नागरिकांना कोरोनाचा धोका ५ टक्के तर भीती ९५ टक्के होती परंतु आज धोका ९५ टक्के झाला असला तर भीती 5 टक्के राहिली आहे. नागरिकांना अजूनही गांभीर्य कळले नसून लोक विनाकारण बाहेर फिरतात. आम्ही जे लोक विनामास्क आढळून येतात त्यांना समज देतो. विशेषतः बाहेर धुणे, भांडी करणाऱ्या महिला कामगारांनी अधिक सावधानता बाळगावी, असे आवाहन केशवस्मृती प्रतिष्ठानचे भरतदादा अमळकर यांनी केले आहे.

 

जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांशी चर्चा करू


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात घेऊन प्रशासनाने अधिक कठोर भुमिका घेणे आवश्यक आहे. स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी जनता कर्फ्युचे पालन केल्यास आपण नक्कीच कोरोनाला अटकाव घालू शकतो. कठोर पाऊले उचलण्यासाठी मी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करणार असल्याचे गफ्फारभाई मलीक यांनी सांगितले.

 

लोकांनी ७ दिवस घरात रहावे


कोरोनाला वेळीच न रोखल्यास परिस्थिती अधिक भयावह होईल. जळगाव शहरवासियांनी ७ दिवस घरातच राहून जनता कर्फ्युचे पालन करावे. आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून सोशल मीडियात व प्रत्यक्षात नागरिकांना आवाहन करतो आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे ललित भैय्या चौधरी यांनी सांगितले.

 

जनता कर्फ्यु आवश्यक


जळगावात कोरोनाला अटकाव करण्यासाठी नागरिकांनी जनता कर्फ्युचे पालन करावे. आम्ही आमच्या माध्यमातून नागरिकांना जनता कर्फ्युचे पालन करण्यास आवाहन करणार आहोत, असे ऍड.प्रकाश पाटील यांनी सांगितले.

 

व्यापाऱ्यांना आवाहन करणार


नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता असल्याने दुकाने सुरू ठेवण्यात आली आहे. परंतु आता कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी जनता कर्फ्यु कसोशीने पाळणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर फिजीकल डिस्टन्स ठेवणे, मास्क वापरणे यासह दुकान दुपारी १२ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यासाठी सर्व दुकानदारांना विनंती करणार असल्याचे फुले मार्केट असोसिएशनचे रमेश मतानी यांनी सांगितले.

 

समाजबांधवांना आवाहन करणार


महापौर करीत असलेल्या जनता कर्फ्युचे आम्ही स्वागत करतो. व्यापाऱ्यांना आणि समाजबांधवांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही जनता कर्फ्युचे पालन करण्यासाठी आवाहन करणार आहोत. तसेच दररोज कोरोनाविषयी जनजागृती करणारी माहिती देखील आम्ही पाठवतो, असे युसूफभाई मकरा यांनी सांगितले.

 

नियम मोडला म्हणून कारवाई


प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यास आम्ही प्रत्येकाला आवाहन करीत आहोत. इतकंच काय तर माझ्या परिचयातील दोन व्यक्ती मास्क वापरत नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मी किंवा माझ्या परिचयातील कुणीही नियम मोडत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी आम्ही प्रशासनाला सहकार्य करू तसेच सर्वांना जनता कर्फ्युचे पालन करण्यास आवाहन करू असे नगरसेवक रियाज बागवान यांनी सांगितले.

 

ईदचा खर्च न करता गरजूंना मदत करणार


अलफैज फाऊंडेशनतर्फे आम्ही मास्क वाटप केले. कोरोना जनजागृती करणारी पुस्तिका घरोघर पोहचवली. जनजागृती करणारे व्हिडीओ सोशल मीडियात पाठवून भावनिक आवाहन केले. कोरोनाविरुद्ध लढा देणे, शासनाच्या निर्देशांचे पालन करणे आपली नैतिक आणि जागतिक जबाबदारी आहे. अलफैज फाऊंडेशनचे अध्यक्ष अजीज सालार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात २३६२ रेशन किट वाटप केले. रमजानमध्ये आवश्यक साहित्य गरजूंपर्यंत पोहचवले. अनेकांना बाहेरगावी जाणे-येण्यासाठी परवाना काढून दिला. लॉकडाऊन काळात ईदनिमित्त दुकानांना परवानगी देऊ नये यासाठी आमच्या काही लोकांनी निवेदन दिले आहे. कोरोनामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे याची जाणीव करून देत ईद साधेपणाने साजरी करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक कुटुंब आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत असून ईदचा खर्च गरजूंच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. कोरोना काळात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक नसताना आम्ही अलफैज फाऊंडेशनकडून त्यांचा अंत्यविधी पार पाडतो. शहरी भागात कोणत्याही व्यक्तीला रुग्णवाहिकेची गरज भासल्यास आमच्या २ रुग्णवाहिका कायम उपलब्ध आहेत, अशी माहिती माजी उपमहापौर करीम सालार यांनी दिली.

Protected Content