जळगाव येथे भरधाव कंटेनरच्या धडकेत दाम्पत्य जागीच ठार

jalgaon accident

जळगाव, प्रतिनिधी | शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर आज (दि.१८) दुपारी २.०० च्या सुमारास पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूलसमोर एका भरधाव कंटेनरने धडक दिल्यामुळे मोटार सायकलस्वार दाम्पत्य जागीच ठार झाल्याची घटना घडली. हा अपघात एवढा जोरदार होता की, मोटार सायकल कंटेनरच्या बोनेटखाली चिरडली गेली होती. तशा अवस्थेत सुमारे ५०० मीटर तिला कंटेनरने फरफटत नेले.

 

महेंद्र गोपालदास आहुजा (वय ४८) , भावना महेंद्र आहुजा ( वय ४८ दोघे रा. गायत्री नगर) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. अपघातानंतर चालक घटनास्थळाहून पसार झाला तर कंटनेरच्या क्लिनरला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. गायत्री नगर परिसरात महेंद्र आहुजा हे पत्नी व तीन मुलांंसह वास्तव्यास होते. त्यांचे फुले मार्केटमध्ये गोपालदास जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. नेहमीच मालाची खरेदी करीत असलेल्या परिचयाच्या ग्राहकाकडे शनिवारी विवाह सोहळा होता. यासाठी घरुन महेंद्र हे पत्नी भावना सोबत दुचाकीने (एम.एच.१९ ए.जे. ८२४८) निघाले. दादावाडी येथे विवाह असल्याची त्यांना माहिती असल्याने ते ग्राहकाच्या दादावाडी येथील घरी गेले. मात्र त्यांना तेथे विवाह समारंभ पाळधी येथील साईबाबा मंदिरात असल्याचे समजल्याने दोघे तेथून पाळधीकडे जाण्यास निघाले. दादावाडीतून निघाल्यावर काहीच अंतरावर महामार्गावर पाळधीकडेच जात असलेल्या कंटेनरने (एम.एच. ०४ जी.एफ ०९८४) आहुजा यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत रस्त्यावर पडून कंटेरनच्या मागच्या चाकात दोघेही सापडले आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल विलास पाटील, गजानन पाटील, चेतन पाटील, उमेश भांडारकर यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. विलास पाटील, गजानन पाटील या कर्मचार्‍यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यातून दाम्पत्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले.

महेंद्र यांना तीन भाऊ तर चार विवाहित बहिणी आहेत. ते सर्वात लहान होते. त्यांना वंशिका (वय १८), प्रिया (वय १२) व ओम (वय ८) अशी तीन मुले आहेत. अपघातात माता – पित्यावर एकाचवेळी काळाने झडप घातल्यामुळे ही मुले पोरकी झाली आहेत. या अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा होवून वाहनांच्या  रांगा लागल्या होत्या.

Protected Content