जळगाव जिल्हा विकासासाठी चौदाशे कोटींची मागणी : पालकमंत्र्यांचे निवेदन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  जिल्ह्यातील महत्वाचे मार्ग पूर्ण झाले असले तरी अजून अनेक मार्गांचे काम बाकी आहेत. यात प्रामुख्याने जळगावातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या ऐवजी थेट गिरणा नदीपासून ते तरसोद फाट्यापर्यंतच्या मार्गाचे विस्तारीकरण करून या मार्गावर उड्डाण पुल उभारावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यातर्फे केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे दिले.

 

यासोबत जिल्ह्यातील इतर महत्वाच्या मार्गांचे काम देखील ना. गडकरी यांनी मार्गी लावावे अशी अपेक्षा सुध्दा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. या सर्व कामांसाठी केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत १४०० कोटी रूपयांच्या निधीची मागणी पालकमंत्र्यांनी केली आहे. आज शिवतीर्थ मैदानावरील महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री बोलत होते. केंद्रीय नागरी वाहतूक व दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत जळगावातील शिवतीर्थ मैदानावर राष्ट्रीय महामार्गांचे लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन ना. नितीन गडकरी यांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील रस्त्याचे दुहेरीकरण करण्यात आले असले तरी यामुळे वाहतुकीची समस्या सुटलेली नाही. यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण करून यात गिरणा पुलापासून ते थेट तरसोद फाट्यापर्यंत सुमारे नऊ किलोमीटर लांबीचा उड्डाण पुल उभारण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व वर्दळीच्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन त्यांचे विस्तारीकरण करण्यात यावे अशी मागणी देखील यात करण्यात आलेली आहे.

या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पाळधी बायपास येथे खेडी-कढोली रस्त्यासाठी अंडरपास निर्माण करावा तसेच पाळधी ते पोखरी तांडा येथे जाण्यासाठी सुध्दा अंडरपास निर्मित करण्यात यावा अशी मागणी सुध्दा यात करण्यात आलेली आहे. यासोबत भुसावळ ते अजिंठा लेणी हा मार्ग अतिशय महत्वाचा आहे. यातील भुसावळ ते जामनेर हा मार्ग राज्य महामार्ग क्रमांक ४४ असा आहे. तर जळगाव ते औरंगाबाद हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने भुसावळ ते जामनेर रस्त्याचे काम करता येत नाही. यामुळे या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषीत करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.

दरम्यान, या निवेदनात पुढे नमूद करण्यात आलेले आहे की, फुफनगरी, ममुराबाद, आसोदा, निमखेडी, मन्यारखेडा, कुसुंबा, मोहाडी, सावखेडा, पाळधी असा सुमारे ३८ किलोमीटर लांबीचा रिंगरोड तयार करण्यात यावा अशी मागणी देखील यात करण्यात आलेली आहे. या सोबतीला, पहूर, जळगाव, विदगाव, कोळन्हावी फाटा, धानोरा, कोळन्हावी या मार्गाची जलनित्सारणासह रूंदीकरण व बांधकाम करण्यात यावे अशी मागणी यात केलेली आहे. तसेच, नशिराबाद, सुनसगाव, बोदवड, जळगाव जिल्हा हद्द या मार्गाचे जलनित्सारणासह रूंदीकरण व बांधकाम करण्यात यावे अशी मागणी देखील यात केलेली आहे. पाळधी जवळ जळगाव ते सुरत या रेल्वे मार्गावर उड्डाण पुल उभारण्यात यावा आणि जळगाव ते चाळीसगाव महामार्गावरील भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आलेली आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

या निवेदनानुसार जळगाव शहरातून जाणार्‍या उड्डाण पुलासाठी ५२५ कोटी रूपयांचा निधी अपेक्षीत आहे. यासोबत फुफनगरी, ममुराबाद, आसोदा, निमखेडी, मन्यारखेडा कुसुंबा, सावखेडा, पाळधी या ३८ किलोमीटर लांबीच्या रिंग रोडसाठी २५० कोटी रूपयांचा निधी लागणार आहे. पहूर, जळगाव, विदगाव, कोळन्हावी फाटा, धानोरा, कोळन्हावी या मार्गाची जलनित्सारणासह रूंदीकरण व बांधकाम करण्यासाठी १११ कोटी रूपये लागणार आहेत. तर, नशिराबाद, सुनसगाव, बोदवड, जळगाव जिल्हा हद्द या मार्गाचे जलनित्सारणासह रूंदीकरण व बांधकाम करण्यासाठी १७१ कोटी रूपये लागणार आहेत. भुसावळ ते जामनेर रस्ता (रा.मा. क्रमांक ४४) याचे जलनित्सारणासह बांधकाम करण्यासाठी ८० कोटी रूपयांचा निधी लागणार आहे. पाळधी गावाजवळच्या जळगाव-सुरत रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलासाठी ८३ कोटी रूपये अपेक्षित आहेत. तर जळगाव ते चाळीसगाव, नांदगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ च्या भूसंपादनासाठी ४ कोटी १४ लक्ष रूपयांचा निधी अपेक्षित आहे. यानुसार या सर्व कामांसाठी १४०० कोटी रूपयांचा निधी मिळावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

Protected Content