जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये शहरातील तीन रूग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे. शहरातील संसर्ग वाढल्याचे यातून दिसून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज रात्री एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांबाबतची ताजी माहिती दिली आहे. यानुसार-जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या 158 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 155 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तीन व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या तीनही व्यक्ती जळगाव शहरातील आहे. यामध्ये मेहरूण येथील 33 वर्षीय महिला व 1 वर्षीय मुलीचा तर श्रीधर काॅलनी येथील 60 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. काल रात्री व आज जिल्ह्यातील सहा व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 183 इतकी झाली असून त्यापैकी पंचवीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकोणतीस रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
काल रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्हा परिषदेतील उच्चपदस्थ अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरलेली आहे. यातच आता शहराच्या विविध भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे आता दिसून येत आहे.