जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जागतिक दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा समाज कल्याण जिल्हा परिषद जळगाव विभागाच्या व दिव्यांग संमिश्र केंद्र तसेच विशेष शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
जनजागृती रॅलीचा प्रारंभ जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, भरत चौधरी, जिल्हा सेवा प्राधिकरणच्या कुमावत मॅडम यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. जीएस ग्राउंड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील व जिल्हा निवडणूक शाखा नायब तहसीलदार हंसराज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅलीचे स्वागत केले. त्यानंतर रॅलीतील सर्व सहभागी विद्यार्थी दिव्यांग बांधव, अधिकारी यांनी निवडणुकीची प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमाच्या ठिकाणी दिव्यांग मतदार आयकॉन मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंदा गोसावी, दिव्यांग संघर्ष संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील, दत्ता महाजन, जितू पाटील तसेच मूकबधिर असोसिएशनचे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या समवेत बिरजू पाटील व नारीशक्ती संघटनेच्या अध्यक्षा मनीषा पाटील या सुद्धा उपस्थित होत्या. रॅलीत शासकीय दिव्यांग समिश्र केंद्र जळगाव, उत्कर्ष मतिमंद विद्यालय जळगाव, प्रौढ मतिमंद मुलांची संरक्षित कार्यशाळा जळगाव, अपंग सेवा मंडळ मूकबधिर नवी पेठ जळगाव, श्रवण विकास मंदिर सावखेडा, दीपस्तंभ फाउंडेशन संचलित मनोबल केंद्र जळगाव येथील दिव्यांग विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. तसेच जळगाव शहरातील दिव्यांग बंधू सुद्धा सहभागी होते. यशस्वीतेसाठी समाज कल्याण विभाग कर्मचारी व शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्र जळगाव अधीक्षक डॉ. किरण शिरसाट, उत्कर्ष मतिमंद विद्यालय जळगाव मुख्याध्यापक संजय बोरसे, श्रवण विकास मंदिर मुख्याध्यापक पद्माकर इंगळे, अपंग सेवा मूकबधिर विद्यालय मुख्याध्यापक एकनाथ पवार सर व कर्मचारी यांनी सहकार्य केले.