जळगावात ‘आयएमए’चा बंद ; निर्णय मागे न घेल्यास तीव्र आंदोलनाच इशारा (व्हिडिओ)

 

जळगाव प्रतिनिधी । ‘सीसीआयएम’ने आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेतल्यानंतर ५८ प्रकारच्या ऍलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याचा निर्णय अधिसूचनेद्वारे नुकताच घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध वैद्यकीय क्षेत्रातील प्रमुख संघटना असलेल्या ‘आयएमए’ने आज (शुक्रवारी) देशव्यापी बंद पुकारून हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही डॉ. फेगडे यांनी यावेळी दिला.

आयएमएच्या जळगाव शाखेने बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे. आयएमएच्या बंदमुळे जळगावातील दवाखाने अत्यावश्यक सेवा वगळता बंद आहेत. या बंदमुळे जळगावातील रुग्ण सेवेवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, आयएमएच्या बंदची माहिती नसल्याने अनेक रुग्णांना तपासणी न करताच माघारी परतावे लागले.

सीसीआयएमच्या अधिसूचनेत बीएएमएस झालेल्या आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणात ५८ ऍलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सीसीआयएमने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात आयएमएने आज देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी आयएमएच्या जळगाव जिल्हा शाखेने जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात आल्या.

हा तर रुग्णांच्या जीवाशी खेळ – डॉ. स्नेहल फेगडे

आयएमएच्या आंदोलनाबाबत बोलताना आयएमएच्या जळगाव शाखेचे सचिव डॉ. स्नेहल फेगडे म्हणाले की, ‘सीसीआयएम’ने (सेंट्रल काउंसिल ऑफ इंडियन मेडिसिन) आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेतल्यानंतर ५८ प्रकारच्या ऍलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा आयएमएच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो. कारण सीसीआयएमने आयुर्वेदिकच्या विद्यार्थ्यांना मागच्या दाराने शस्त्रक्रियेसाठी परवानगी देणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. हा निर्णय त्वरित मागे घेतला पाहिजे. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही डॉ. फेगडे यांनी यावेळी दिला. आंदोलनात आयएमएच्या जळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह डॉक्टरांनी सहभाग घेत निदर्शने केली.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/184193613424345

Protected Content