जळगावातून चोरीला गेलेली दुचाकी सापडली;

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट परिसरातून सोमवारी २० डिसेंबर रोजी चोरीला गेलेली दुचाकी धुळे शहरात पोलीसांना बेवारस म्हणून आढळून आली आहे. याप्रकरणी पुढील चौकशी करण्यासाठी शहर पोलीस कर्मचारी धुळ्याला रवाना झाले आहे.

शहरातील एसएमआयटी महाविद्यालय परिसरातील निवृत्तीनगर येथे रणछोडाराम तेजराम चौधरी (वय-३०) हे वास्तव्यास आहेत. त्यांचा भाऊ परशुराम चौधरी यांच्या नावावर असलेली दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.टी.५३७२) ही रणछोडाराम हे वापरतात. २० रोजी सकाळी ९.३० वाजता रणछोडाराम हे खाजगी कामासाठी गोलाणी मार्केट परिसरात दुचाकीने आले. यादरम्यान त्यांनी दुचाकी गोलाणी मार्केट परिसरातील सुगोकी हॉटेल समोर पार्किंग केली. काम आटोपून दुपारी १२.३० वाजता ते परतले असता त्यांना त्यांची दुचाकी जागेवर दिसून आली नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान ही सदरील क्रमांकाची दुचाकी धुळे शहर हद्दीत बेवारसरीत्या आढळून आली आहे. धुळे शहर पोलीसांनी दुचाकी पोलीसात जमा केली आहे. दुचाकीच्या नंबरवरून धुळे शहर पोलीसांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात संपर्क करून दुचाकीची माहिती मिळविली असता शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी झाल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. जळगाव शहर पोलीस कर्मचारी दुचाकी घेण्यासाठी धुळे येथे रवाना झाले आहे.

Protected Content