जळगाव प्रतिनिधी । सध्या अनेक व्यापार्यांना अडचणी येत असल्याया पार्श्वभूमिवर शासनाच्या निर्देशाबाबत काही अडचणी असल्याने महापौर सौ.भारती सोनवणे यांनी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे सदस्य आणि उपायुक्त यांचा समन्वय घडवून आणला. व्यापार्यांनी निवेदनात केलेल्या मागण्या मान्य झाल्या असून शासनाचे निर्देश स्पष्ट करीत त्याचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लॉकडाऊन काळातील काही नियम शिथिल करून नवीन निर्देशानुसार दुकाने उघडण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. दि.५ जूनपासून दुकाने सुरू करण्यात आली असली तरी मनपा प्रशासनाकडून केल्या जाणार्या कारवाईमुळे दुकानदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्या सदस्यांनी अडचण महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या लक्षात आणून दिली. याबाबत महापौरांनी तात्काळ मनपात महामंडळाचे पदाधिकारी व उपायुक्त यांची चर्चा घडवून आणली. यावेळी स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, प्रशांत नाईक, चेतन सनकत यांच्यासह जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बरडीया, सुरेश चिरमाडे, युसूफ मकरा, सुशील हसवानी, सुशील नवाल, जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे महापौर सौ.भारती सोनवणे, आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त संतोष वाहुळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महापौरांनी घडवून आणलेल्या समन्वयात व्यापार्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यात कोणत्याही व्यापारी संकुलातील दुकानदाराला माल किंवा कागदपत्रे काढण्यासाठी मुभा हवी असल्यास त्यांनी रीतसर अर्ज द्यावा, उपायुक्त संतोष वाहुळे व एच.एम.खान यांच्या पथकाशिवाय इतर कुणीही दुकान सील करण्याची कारवाई करू नये, अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असल्याने मनपा कर्मचार्यांनी दुकान बंद करण्यास बळजबरी करू नये, दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्याचे शूटिंग वरिष्ठ अधिकार्याच्या उपस्थितीत करावे, सर्व प्रकारच्या मालाची ने-आण करण्यास परवानगी द्यावी, शहरात सर्व्हेक्षण करण्यासाठी फिरत असलेल्या मनपा कर्मचार्यांना ओळखपत्र द्यावे, दुकान सील करण्याची धमकी देऊन व्यापार्यांना मानसिक त्रास देऊ नये, प्रतिबंधित क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तू विक्री करणार्या दुकानात माल ने-आण करण्यासाठी हमालांची हातगाडी जाईल यासाठी जागा सोडावी आदी मागण्या मान्य करण्यात आल्या.