जळगावातील प्रेयसी व प्रियकर यांच्यातील वाद मिटविण्यासाठी खंडणी प्रकरणातील दोन महिलांना अटक

जळगाव प्रतिनिधी । प्रेयसी व प्रियकर यांच्यातील वाद मिटविण्यासाठी दोघांच्या पालकांकडून १ लाख ५५ हजारांची खंडणी उकळल्या प्रकरणी तथाकथित दोन महिला समाजसेविकांविरूध्द जुन महिन्यात जळगावातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या दोन्ही महिलांना पोलिसांनी गुरूवारी 16 जुलै रोजी रात्री अटक केली असून त्यांना आज शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वंदना भगवान पाटील (राहणार राजपूत कॉलनी, हरिविठ्ठलनगर) व रेखा सुभाष पाटील (राहणार आरएमएस कॉलनी) असे अटक केलेल्या महिलांचे नाव आहे़

शहरातील १९ वर्षीय तरूणीचे सोबतच शिक्षण घेत असलेल्या तरूणाशी प्रेमप्रकरण सुरू होते़ काही कारणास्तव दोघांमध्ये वाद झाल्याने प्रियकराने प्रेयसीशी बोलणे बंद केले़ तिच्या फोनलाही प्रतिसाद देत नव्हता़ त्यामुळे तरूणीने १५ मे रोजी रेखा पाटील यांच्याकडे जाऊन प्रेम प्रकरणाची माहिती दिली़ त्यानंतर १६ रोजी तरूणी रेखा पाटील यांच्या घरी गेली असता या दोन्ही महिलांनी तरूणीची एका कोऱ्‍या कागदावर स्वाक्षरी घेतली़ त्यानंतर तिघेजण रामानंदनगर पोलीस ठाण्यात जाऊन अर्ज दिला़ याठिकाणी प्रियकर व त्याच्या वडीलांना बोलवून वाद मिटविण्यात आला़ त्यानंतर रेखा पाटील यांनी तुझा प्रियकर लग्न करण्यास नाही म्हणतो, त्याला आम्ही पाहतो,असे तरूणीला सांगून या महिलांनी तिला घेवून त्यांच्या घरी नेले़ या कामासाठी आम्ही शुल्क घेतो असे तरूणीला सांगितले़ विषय संवेदनशिल असल्यामुळे तरूणीच्या वडीलांनी ५५ हजार रूपये महिलांना दिले़ परंतु, २६ मेपर्यंत तरूणीला घरातच डांबून ठेवले़ दरम्यान, दोन्ही महिलांनी तरूणाच्या वडीलांनाकडे १ लाख ७० हजाराची मागणी केली व एक लाख घेतले देखील़ परंतु, तरूणीने महिलांची नजर चुकवून घर गाठल्यानंतर दोन्ही समाजसेविका महिलांनी वाद मिटविण्याच्या गैरफायदा घेवून १ लाख ५५ हजार रूपयांची खंडणी उकळल्याचे बिंग फुटले़ नंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता़

दोन दिवसांची पोलीस कोठडी
खंडणी प्रकरणातील तथाकथित समाजसेविका वंदना पाटील व रेखा पाटील या दोघांना रामानंदनगर पोलिसांनी गुरूवारी अटक केले असून त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांनी दिली़

Protected Content