जळगावला कोरोनाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा मंजूर : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची मागणी मान्य !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव येथे कोरोनाची चाचणी करणारी लॅब उपलब्ध करण्यात यावी या पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मागणीला राज्य सरकारने मान्यता दिली असून शासकीय वैद्यकीय रूग्णालयात कोरोनाची चाचणीसाठी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. याबाबत शासनाचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, 7 एप्रिल रोजी राज्य मंत्री मंडळाची (कॅबिनेट ) बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून पार पडली. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे देखील यात जिल्ह्याधिकारी कार्यालयातून सहभागी झाले होते. यात त्यांनी जिल्ह्यातील रूग्णांसाठी जळगाव जिल्ह्यात कोरोना तपासणीसाठी लॅबची मागणी केली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या मागणीला तत्वत: मान्य केली असून लवकरच प्रस्ताव मागविण्यात येणार असल्याची माहिती ना. पाटील यांनी दिली होती. दरम्यान, ही मागणी आता मान्य करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये या विभागाच्या अखत्यारीत येणार्‍या राज्यातील सहा शासकीय रूग्णालयांमध्ये कोरोनाची चाचणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे. जळगावसह बारामती, कोल्हापूर, गोंदिया, नांदेड आणि आंबेजोगाई येथील रूग्णालायांमध्येही आता कोरोना चाचणी होणार असून याबाबतचे परिपत्रकदेखील जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोना चाचणीसाठी जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा वार्षीक योजना, स्वीय प्रपंची खाते व महात्मा फुले जनआरोग्य योजनांच्या अंतर्गत निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या प्रयोगशाळेसाठी लागणारी सामग्री ही जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित करण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही यात म्हटले आहे.

कोरोना चाचणीची सुविधा जळगावात उपलब्ध झाल्यामुळे जिल्ह्यातील रूग्णांचे निदान करण्यासाठी आता जास्त वेळ लागणार नाही. यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य होतील असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कोरोनाच्या प्रतिकारासाठी अचूक नियोजन केले असून ते दररोज प्रशासकीय उपाययोजनांना आढावा घेत आहेत. जळगावात कोरोनाची चाचणी उपलब्ध झाल्याने कोरोना विरोधी लढ्यास चांगले बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content