जळगावच्या बाजारात गर्दी उसळली; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात व जिल्ह्यात २२ मार्चपासून लॉकडाऊन पुकारण्यात आले होते. जवळपास ७८ दिवसानंतर जळगाव शहरात पुर्वीप्रमाणेच गर्दीचे स्वरूप आज पहायला मिळाले आहे. मात्र शहरातील मनपाची व्यापारी संकुले बंदच आहेत. शहरातील रस्त्यावरील दोन्ही बाजूंची दुकाने जवळजवळ पुर्ण उघडली असल्याचे दृष्य दिसून येत आहे.

लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजच्या प्रतिनिधीने शहरातील प्रमुख चौकात फेरफटका मारला असता, शास्त्री टॉवर परिसर, महात्मागांधी मार्केट, दाणा बाजार, तिजोरी गल्ली, पोलन पेठ, सुभाष चौक परिसर, बळीराम पेठ, नवी पेठ तसेच कोर्ट रोड परिसरातील प्रमुख रस्त्यावर मोठी लगबग दिसून आली. लॉकडाऊनचा पाचवा टप्पा ३० जून पर्यंत जरी असला मात्र लोकांनीच हा लॉकडाऊन तोडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. शहरातील मनपाचे व्यापारी संकुले मात्र ९० टक्के बंद आहेत. लॉकडाऊनमध्ये बरीच शिथिलता दिली आहे. शहरातील बऱ्याच व्यवसायिकांनी तब्बल अडीच महिन्यानंतर नव्याने सुरूवात केली आहे. त्यातल्या त्यात आज सोमवार असल्याने शहरातील रस्त्यावर विविध खरेदीसाठी नागरीकांची मोठया प्रमाणावर गर्दी झाली आहे. त्याचप्रमाणे बाजारपेठेत कैऱ्यांची आवक झाल्याने लोणचे बनविण्याचे मसाला खरेदीसाठी महिलांची रेलचेल दिसून आली. विशेष बाब म्हणजे बहुतांश नागरिकांनी मास्कचा वापर करतांना दिसून आले नाही. सोशल डिस्टन्सिंगचा पुर्णपणे फज्जा उडाला असून कोरोना गेला की काय ? यक्षप्रश्न असा अनेकांना पडला होतो. नागरिकांना शासनाने जी सवलती दिली आणि नागरीकांची गर्दी पाहता कोरोनाची धोक्याची उंची वाढेल असे सुज्ञ नागरीकांकडून बोलले जात असून प्रशासनाकडून या गर्दीबद्दल योग्य तो सकारात्मक पुन्हा निर्णय घ्यावा, आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात कडक कारवाई करावी अशी अपेक्षा नागरीकांकडून होत आहे. आज शहरातील विविध भागात रिक्षांचीही वर्दळ दिसून आली आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/561367881485020/

Protected Content