जळगावच्या टाटिया शिशुगृहाची मान्यता रद्द!

जळगाव प्रतिनिधी । येथील वादग्रस्त आनंदराज माणिकलाल टाटिया शिशुगृहाची मान्यता अखेर रद्द करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील एका वकील दांपत्याला या शिशुगृहातून बाळ दत्तक देण्यात आले होते. त्यासाठी या चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव वीरेंद्र धोका यांनी बाळ दत्तक देण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केली होती. संस्थेच्या तीन शिशुगृहातून तब्बल ३७० बालके पैसे घेऊन दत्तक दिल्याची कबुली धोका यांनी दिली होती. त्याबाबत अ‍ॅड.पाटील यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनद्वारे हा गैरप्रकार समोर आला होता. त्यानुसार महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांनी जळगावात येऊन टाटिया शिशुगृहाची तपासणी केली होती. त्या तपासणीमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. या शिशुगृहातून अनधिकृतरीत्या बालके दत्तक देण्यात आल्याचे या तपासणीत स्पष्ट झाले होते. या कारभारात शिशुगृहातील कर्मचार्‍यांचाही सहभाग होता. शिशुगृहाच्या नावावर अनाथ बालकांची थेट विक्री करण्यात येत होती. त्याचा अहवाल मंत्रालयाला सादर केला. या धोकादायक कारभारामुळे महिला व बालविकास विभागाने शिशुगृहातील मुले औरंगाबाद येथील संस्थेत त्याचवेळी स्थलांतरित केली होती. आता मात्र या शिशुगृहाची मान्यताच रद्द करण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content