जळगावच्या एसटी स्थानक प्रमुखांची पाचोऱ्याला बदली

जळगाव, प्रतिनिधी | येथील स्थानक प्रमुख निलिमा बागुल यांची पाचोरा येथे बदली करण्यात आली असून त्या पाचोऱ्यात आज पदभार स्वीकारणार आहेत. सह आगार व्यवस्थापक निलेश पाटील यांनीही या वूत्ताला दुजोरा दिला

एसटी वाहक मनोज चौधरी यांच्या आत्महत्येच्या मुद्यावर जळगाव विभागाच्या सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीने संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. जळगाव आगारातील वाहक स्व. मनोज अनिल चौधरी यांच्यावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी जळगाव विभागाच्या संयुक्त कृती समितीने विभाग नियंत्रक नियंत्रकांकडे केलेली होती.

आज दि १ जानेवारी रोजी स्थानक प्रमुख निलिमा बागुल यांना पाचोरा येथे रुजू करण्याचे आदेश दिले गेले. संयुक्त कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक जळगाव आगारात होऊन आंदोलन सुरू केले होते. या बैठकीत स्वर्गीय मनोज चौधरी यांना न्याय मिळवण्यासाठी सर्व संघटनांनी एकजूट दाखवली. श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर स्वर्गीय मनोज चौधरी यांच्यावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई न झाल्यास संयुक्त कृती समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा संयुक्त कृती समितीच्या वतीने एसटी प्रशासनाला देण्यात आला होता.

संयुक्त कृती समिती सदस्य सुरेश चांगरे, नरेंद्रसिंग राजपूत, आर के पाटील, शैलेश नन्नवरे, विनोद शितोळे, गोपाळ पाटील, मनोहर मिस्त्री, मनोज सोनवणे यांच्यासह आगारातील शेकडो कर्मचाऱ्यांनी या महत्त्वपूर्ण बैठकीत भाग घेतला. कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात लिखित तक्रारदेखील दिली. काही अधिकाऱ्यांकडून नेहमीच एसटी कर्मचाऱ्यांना त्रास होत असल्याचे तसेच विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्याबाबत धमक्या मिळत असल्याने संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा व अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर देखील कडक कारवाई करावी अशी मागणी सर्व कर्मचाऱ्यांनी केली. बैठकीपूर्वी स्व. मनोज चौधरी यांच्या नातेवाईकांनी कृती समिती सदस्यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली होती.

नियमांच्या अधीन राहूनच बढतीवर बदली : निलीमा बागूल

दरम्यान, या प्रकरणी निलीमा बागूल यांनी निवेदनाच्या माध्यमातून आमच्याकडे आपली बाजू मांडली. यात त्यांनी म्हटले आहे की, माझी पाचोरा येथे झालेली बदली ही नियमाच्या अधीन राहून करण्यात आलेली आहे. यात मनोज चौधरी यांच्या प्रकरणाचा काहीही संबंध नाही. आपली नियमीत बदली नसून बढतीवर बदली करण्यात आलेली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. हा आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे.

Protected Content