जळगाव राहूल शिरसाळे । जळगावात सध्या अमृत योजनेचे काम सुरू असून यात वॉटर मीटरच्या पैशांचा समावेश नसल्याने प्रत्येक कुटुंबावर जवळपास १६ हजार रूपयांचा भार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणावरून नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेत जनतेवर पैशांचा भार देऊ नका अशी मागणी केली आहे.
सध्या अमृत योजनेच्या कामाला गती मिळाली असून यासोबत आता वॉटर मीटरचा मुद्दा चर्चेत आला आहे. अमृतची कामे होण्याआधी प्रत्येक घरात नळाचे नवीन कनेक्शन घ्यावे लागणार आहे. मात्र अमृत योजनेत मीटरसाठीच्या पैशांचा समावेशच करण्यात आला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमिवर नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी याबाबत आवाज उठविला आहे.
नवनाथ दारकुंडे म्हणाले की, अमृतच्या योजनेत वॉटर मीटरच्या पैशांचा समावेश न करणे हा अतिशय गंभीर मुद्दा असून यातील दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. जळगावातील जनतेला साधारणपणे १६ हजार रूपयांचा फटका बसणार असून यासाठी कारणीभूत ठरणार्या अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. स.ना. भालेराव हे नगराध्यक्ष असतांना त्यांनी वॉटर मीटर लावण्याचा केलेला प्रयत्न हा त्यांच्या अंगलट आला असल्याची आठवण त्यांनी करून दिली.
जळगावातील जनतेला मोफत नळ मीटर मिळावे अशी मागणी नवनाथ दारकुंडे यांनी केली आहे. या केंद्रीय योजनेसाठी भाजपचे लोकप्रतिनिधी पाठपुरावा करतील असेही ते म्हणाले. या संदर्भात आपण आधीच आयुक्तांना पत्र दिले असून पुढील महासभेत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
खालील व्हिडीओत पहा नवनाथ दारकुंडे नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/788694255018904