जळगावकरांनो….आता सावरा, नाहीतर स्थिती अवघड बनेल !

जळगाव प्रतिनिधी । शहरात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर प्रत्येक नागरिकांने लॉकडाऊनचे सक्तीने पालन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा लवकरच भीषण स्थिती निर्माण होण्याची भिती आहे.

कोरोनाच्या प्रतिकारासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला असला तरी याचे शहरासह जिल्ह्यात सर्रास उल्लंघन होतांना दिसून येत आहे. याबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेऊनही फारसा फरक पडल्याचे जाणवत नाही. सकाळी बंदी शिथील असतांनाच्या कालावधीत ठिकठिकाणच्या भाजी बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे. लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून आपण जळगावच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेतील हजारोंच्या जनसमुदायाचा व्हिडीओ अवश्य पाहिला असेल. सोशल डिस्टन्सींगचा कोणताही नियम न पाळता याच प्रकारे ठिकठिकाणी गर्दी होत आहे. या माध्यमातून नागरिक आपल्यासह समाजालाही खूप मोठ्या धोक्यात टाकत असल्याची बाब आपण सर्वांना लक्षात घ्यावी लागणार आहे. याची खूप मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागू शकते. यातच जळगाव येथील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचा झालेला मृत्यू ही आपण सर्वांसाठी धोक्याची घंटा बनली आहे.

हे देखील वाचा : कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

जळगाव येथे मृत पावलेला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण हा अलीकडच्या काळात कुठेही प्रवासाला गेलेले नव्हता. यामुळे त्याला झालेला संसर्ग हा बाहेरून नव्हे तर जळगावातच झाल्याचे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. आता हा रूग्ण ज्यांच्याही संपर्कात आलेला होता ते कोरोनाच्या संसर्गाच्या छायेत आहेत. तर कोरोनाची लागण आता मोठ्या प्रमाणावर उघडकीस येण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. कोरोनाचा प्रतिकार करण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे याची जैविक साखळी तोडणे हाच होय. यासाठी सोशल डिस्टन्सींग हा एकमेव पर्याय असला तरी सरकारने आखून दिलेल्या नियमांची होणारी पायमल्ली ही अतिशय वेदनादायी अशीच आहे. आता कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या झालेल्या मृत्यूने तरी आपण सर्वांनी जागे होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा वेळ निघून गेल्यानंतर सारे काही संपलेले असेल.

हे देखील वाचा : पाच मिनिटात मिळणार कोरोना संसर्गाची माहिती

लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आमचे सर्व वाचक आणि प्रेक्षकांना कळकळीची विनंती करत आहोत. आपण सर्वांनी लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. घरातच बसा, आपल्या कुटुंबाशी संवाद साधा आणि कोरोनाचा प्रतिकार करा. जळगावकरांनो, सावरा आता अन्यथा पुढे अनर्थ आपली वाट पाहत आहे. आता कोणता पर्याय निवडायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content