जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समाजबांधवांच्या उत्साहामध्ये आणि “जय जय परशुरामा”च्या जयघोषामध्ये शहरात शनिवारी २२ एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषामध्ये भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा विविध मार्गांवरून काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये महिला व लहान मुलांचे लेझीम आणि ढोल पथकाने विशेष लक्ष वेधून घेतले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बहुभाषिक ब्राह्मण संघ “श्री परशुराम जन्मोत्सव २०२३” साजरा करण्यात आला. शनिवारी सकाळी १० वाजता भगवान श्री परशुराम पूजन जुने श्रीराम मंदिर, रथ चौक येथे झाले. यावेळी स्वाती – संजय कुलकर्णी व सौ. संतोष – शिवप्रसाद शर्मा या दोन दाम्पत्यांनी पूजन केले. प्रसंगी बहुभाषिक ब्राह्मण संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
संध्याकाळी ४ वाजता जूने जळगाव येथील श्रीराम मंदिर संस्थान येथे भगवान श्री परशुराम यांच्या रथयात्रेचे संस्थांनचे गादिपती हभप मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर रथयात्रेला प्रारंभ करण्यात आला. रथयात्रा वाजत गाजत भवानी माता मंदिर या ठिकाणी आली. येथे पंडित महेश त्रिपाठी, जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल राव, एड. सुशील अत्रे अशोक साखरे, अशोक वाघ, प्रशांत जुवेकर, पियुष रावळ यांच्या हस्ते भगवान श्री परशुराम यांचे पूजन करण्यात आले.प्रसंगी सकल् समाजाचे सर्व अध्यक्ष तथा प्रमुख देणगीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर भगवान श्री परशुराम यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये अग्रभागी भगवान श्री परशुराम यांची भव्य मूर्ती ठेवण्यात आलेली होती. मूर्तीच्या मागे फिरणारे चक्र लक्ष वेधून घेत होते. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शहराचे आमदार राजूमामा भोळे, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गुलाबराव देवकर, वाल्मीक पाटील, श्रीराम खटोड, दीपक जोशी, श्रीकांत खटोड, ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर महिला मंडळाचे अध्यक्ष मनीषा दायमा मंचावर उपस्थित होते. आमदार भोळे आणि गुलाबराव् देवकर यांनी मनोगत मधून समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
मिरवणुकीमध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या वेशभूषांमध्ये अथर्व कुलकर्णी तर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषामध्ये लक्ष्मी जोशी, अश्वध्वज घेऊन घोड्यावरती स्वार झालेले होते. मिरवणुकीमध्ये समाज बांधवांनी फेटे आणि भगव्या टोप्या तर हातामध्ये भगवेध्वज घेऊन सहभाग नोंदवला होता. लहान मुलांसह महिला व पुरुषांनी मिरवणुकीमध्ये जल्लोष केला. मिरवणुकीचे विविध संस्थांतर्फे स्वागत करण्यात येत होते.
शोभायात्राचा नेताजी सुभाष चौक, दाणा बाजार, चित्रा चौक मार्गे शिवतीर्थ मैदान या ठिकाणी समारोप झाला. येथे भगवान श्री परशुराम यांची महाआरती झाली. प्रसंगी दादा महाराज जोशी यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. शोभायात्रा व विविध कार्यक्रमांसाठी बहुभाषिक ब्राह्मण संघाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.