जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील समता नगरातील बंद असलेल्या घराला अचानक आग लागून घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. ही घटना शनिवारी (७ सप्टेंबर) संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास समतानगरातील धामणगाव वाडा परिसरात घडली. या घटनेबाबत पोलिसात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, किशोर सदाशिव चव्हाण यांचे समता नगरातील धामणगाव वाडा परिसरात पत्र्याचे घर आहे. शनिवारी सात सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चव्हाण हे कामावर गेले होते तर त्यांच्या पत्नी बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी बंद असलेल्या घराला अचानक आग लागली. ही घटना समजताच या परिसरातील नागरिकांनी अग्नीशमन दलाला माहिती दिली. त्या वेळी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यापूर्वीच आजूबाजूच्या नागरिकांनी पाण्याच्या सहायाने आग विझविली. मात्र तोपर्यंत घरातील कपडे, अंथरुण, धान्य व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.