अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाचे प्राण आर्डी येथील युवकाने वाचविले असून त्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
तालुक्यातील आर्डी शिवारात हरणाचे कळप दिसून येतात. सध्यस्थीतीत पाऊस लांबल्याने आज ता.२० रोजी पाण्याच्या भटकंतीत फिरत असताना कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने हरीण जखमी झाले. सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास आर्डी गावातून भूषण रामलाल वानखेडे या तरुणाने आर्डी शिवारातील जंगलात हरीण जखमी अवस्थेत पडले असल्याचे दिसून येताच अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मिलिंद भामरे यांना संपर्क केला. मिलिंद भामरे यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना घटनेबाबत कळवुन लागलीच वनपाल प्रेमराज योगराज सोनवणे यांना फोन द्वारे कळवून जखमी हरणाच्या मदतीसाठी आर्डी गावाला वनपाल सोनवणे व वनरक्षक रामदास वेलसे हे ताबडतोब आर्डी गावी पोहोचले.
त्यांनी जखमी हरणास जंगलात शोध घेऊन जखमी हरणावर आधी प्रथमोपचार केले. प्रथमोपचार केल्यावर एका खाजगी रिक्षाने अमळनेर येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून हरणाला चालता येत नसल्याने खाजगी वाहनाने अमळनेर येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात आणीत उपचार करण्यात आले. आर्डी येथील भूषण वानखेडे या तरुणाच्या सतर्कतेने व पोलीस हवालदार मिलिंद भामरे, गणेश पाटील व वनपाल सोनवणे व वेलसे यांच्या सहकार्याने जखमी हरणीला जीवदान दिले आहे. यामुळे त्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
दरम्यान, सध्या पावसाळा लांबल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. त्यातच मागील आठवड्यात पाण्याच्या शोधात असलेले हरीण विहीरीत पडल्याची घटना घडली होती. प्राण्यांसाठी जंगल शिवारात जागोजागी पाणवठे बनविणे आवश्यक आहे. वनविभाग खात्याने याकडे लक्ष घालून जागोजागी पाणवठे तयार केल्यास वन्य प्राण्यांची भटकंती थांबेल. यामुळे या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.