पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ सुरु असलेले रिझानी ब्रॅन्डी हाऊस इतरत्र हलविण्यात येवुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची होत असलेली विटंबना तात्काळ थांबवावी. यासाठी येथील वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असुन यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव दिपक परदेशी, तालुकाध्यक्ष विशाल बागुल यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, जळगांव यांचेकडे तक्रारी अर्ज दाखल केला आहे.
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पुतळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळच देशी, विदेशी दारुचे रिझानी ब्रॅण्डी हाऊस असुन याठिकाणी दिवसभर ग्राहकांची रेलचेल सुरू असते. ग्राहकांच्या वाहनांमुळे रहदारीस अर्थळा निर्माण होतो. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना होत आहे. सदरचे रिझानी ब्रॅण्डी हाऊस इतरत्र हलविण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. पाचोरा नगरपरिषदेकडे ६ आॅक्टोबर १९८५ रोजी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणे बाबतचा ठराव आल्याने महापुरुषांप्रमाणेच आपण ही महान कार्य करावे यासाठी महापुरुषांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
मुंबई दारुबंदी कायदा अंतर्गत देशी व विदेशी मद्य विक्री करिता आवश्यक असलेल्या बाबींची चौकशी करुन सन – १९४९ मध्ये दारुबंदी कायदा करण्यात आला. त्यातही देशी व विदेशी मद्य विक्रीकरिता आवश्यक बाबींमध्ये नंबर ५ जागेबाबत आवश्यक बाबी मधील नंबर ८ नुसार मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, धार्मिक संस्था, शाळा संदर्भातील अंतर १०० मीटरच्या आत येऊ नये, मग त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व संबंधित रिझानी ब्रॅण्डी हाऊस यातील असलेले अंतर दिसुन आले नाही का ?, २५ नोव्हेंबर २००६ रोजी पाचोरा नगरपरिषदेने रिझानी ब्रॅण्डी हाऊसला दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्राची चौकशी व्हावी तसेच २५ फेब्रुवारी २०१५ चा मुंबई देशी व विदेशी मद्य विक्री अधिनियम – २०१५ नुसार महापुरुषांच्या नाव व मद्य विक्री दुकानांच्या अंतरा संदर्भात शासन परिपत्रक तपासुन पाहुन त्याची अंमलबजावणी का केली नाही ? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून या रिझानी ब्रॅण्डी हाऊसमुळे सुरू असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची सुरू असलेली विटंबना तात्काळ थांबविण्यात येवुन रिझानी ब्रॅण्डी हाऊसचा परवाना कायम स्वरुपी रद्द करण्यात यावा. असे न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव दिपक परदेशी व तालुकाध्यक्ष विशाल बागुल यांनी प्रशासनास तक्रारी अर्जाद्वारे दिला आहे.