अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील न्यू प्लॉट भागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या नुतनीकरणासाठी आ.अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी 50 लाखांचा निधी मिळाला असल्याने या निधीतून नुतनीकरणाचे काम प्रगतीपथावर असून या कामाची नुकतीच आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पाहणी केली.
सदर उद्यानात सिमेंट व पेव्हर ब्लॉक ऐवजी विटा,माती व घेस वापरून मोठ्या मैदानात असतो तसा तंत्रशुद्ध पद्धतीचा आणि चालणे व धावण्यासाठी कुणालाही शारीरिक दृष्ट्या त्रासदायक ठरणार नाही असा अतिभव्य वॉकिंग ट्रॅक साकारला जात असल्याने सदर ट्रॅक अमळनेर कर नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे. एका वेळेस अनेक जण सहज चालू शकतील अशी विस्तीर्ण रुंदी या ट्रॅक ची करण्यात आली आहे.याशिवाय सदर उद्यानात लहान कार्यक्रमासाठी स्टेज, अंतर्गत सुशोभीकरण, खेळणी, ओपन जिम,लॉन, स्वच्छता गृह,पाणी टाकी खाऊ कट्टा असे बरेच काही टप्प्याटप्प्याने साकारले जाणार आहे.
अमळनेर शहरात मध्यवर्ती भागात हे एकमेव मोठे उद्यान असल्याने ते पिकनिक स्पॉट ठरावे असा प्रयत्न आमदारांचा असून यासाठी 50 लाख व्यतिरिक्त आवश्यक तो निधी टप्प्याटप्प्याने उपलब्द करण्याचे नियोजन आमदार पाटील हे करीत आहेत. कामाची क्वालिटी,स्वरूप आणि वेग पाहण्यासाठी आमदार पाटील यांनी प्रत्यक्ष उद्यानात येऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सदर कामाचे ठेकेदार गणेश ठाकरे, संजय शिरोडे, बुकवाला तसेच पालिकेचे अभियंता वाघ यांना कामासंदर्भात आवश्यक त्या सूचना केल्या.
यावेळी प्रशासन अधिकारी संजय चौधरी, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपुत, माजी नगरसेवक विनोद कदम, बिपिन पाटील, प्रसन्न जैन यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप आणि न्यू प्लॉट विकास मंचचे देखील मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. या ग्रुपच्या वतीने संजय चौधरी व चेतन राजपूत यांनी काही नवीन संकल्पना आमदारांसमोर मांडल्या त्यास सकारात्मक प्रतिसाद आमदारांनी दिला. शेवटी कामाला अजून वेग देण्याच्या सूचना आमदारांनी ठेकेदारास केल्या. तर होत असलेल्या भव्य ट्रॅक पाहून उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.