मुंबई (वृत्तसंस्था) तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायचं नाही का? चौथीची पोरगी पण सांगेल की यांचं काही खरं नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, हे सरकार मुंबईबाबत एकही धड निर्णय घेत नाही. केवळ मूर्खपणाचे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे आजार राहिला बाजूला मुंबईकर वैतागले आहेत. आम्ही काही बोललो की जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील लगेच बोलतात आम्हाला सत्तेची हाव लागलीय. सरकारला नक्की लॉकडाऊन कडक करायचा आहे की अनलॉक करायचं आहे? एकीकडे अनलॉक सुरू करत आहोत सांगितले जात आहे. दुसरीकडे कडक निर्बंध लादले जात आहेत. नक्की काय चालू आहे हेच कळत नाही. या सरकारने एकट्या देवेंद्र फडणवीस यांना जरी त्यांचे दिवसांचे दोन तास मागितले असते तरी प्रश्न निकाली निघाले असते. पण या सरकारचा इगो आडवा येतो, दुसरे काय? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.