राजकारण म्हणून प्रियांका गांधींना त्रास दिला जातोय ; थोरात यांचा मोदी सरकारवर आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) अलीकडच्या काळात प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढते आहे. केंद्र सरकार ज्या चुका करतंय, त्याबद्दल प्रियांका या सरकारला प्रश्न विचारत आहेत. हे प्रश्न त्यांनी विचारू नयेत म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. आजही प्रियांका गांधी कुटुंबाला धोका आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा आणि आता राहते घर काढून घेणे हे दुर्दैवी आहे. केवळ राजकारण म्हणून त्यांना त्रास दिला जात आहे,’ असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर केला आहे.

 

मोदी सरकारनं काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांना दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस बजावली आहे. बंगला खाली करण्यासाठी त्यांना १ ऑगस्ट २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यावर बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर टीका करतांना म्हटले आहे की, प्रियांका गांधी यांची सुरक्षा आणि आता राहते घर काढून घेणे हे दुर्दैवी आहे. प्रियांका गांधी यांनी स्वत:ची आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी यांचा मृत्यू पाहिला आहे. आजही त्यांच्या कुटुंबाला धोका आहे. असं असताना केवळ राजकारण म्हणून त्यांना त्रास दिला जात आहे. जनतेच्या हिताचे प्रश्न विचारणं हे विरोधी पक्षाचं काम असतं. ते काम काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते, प्रियांकाजी व राहुलजी करत आहेत. त्यांच्या प्रश्नाची उत्तरं केंद्र सरकारकडे नाहीत. त्यामुळे विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे.

Protected Content