यावल, प्रतिनिधी | येथील नगर परिषदच्या माध्यमातुन उभारण्यात आलेल्या नविन साठवण तलावात लाखो रुपयांचा गैरव्यहार व भ्रष्ठाचार करण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांचे कडे दि. ३o सप्टेंबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे. त्या तक्रारीनुसार संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत जुन्या व नव्या साठवण तलावाचे कोणतीही दुरुस्ती कामे व नवे काम करू नये अशा आशयाचे निवेदन आज यावल मुख्यधिकारी यांच्याकडे भाजपाच्या वतीने देण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टीने दिलेल्या माहीतीनुसार दिनांक ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, यांच्यासह नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे , माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस , विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, माजी जलसंपदामंत्री व आमदार गिरीश महाजन , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष व आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे पक्षाच्या माध्यमातुन यावल नगर परिषदच्या साठवण तलावाच्या उभारणीत भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. तरी सदर भ्रष्टाचाराबाबत केलेल्या तक्रारीचा वरिष्ठ पातळीवरती चौकशी होऊन योग्य ते निर्णय लागत नाही तो पर्यंत जुना साठवण तलाव व नवीन साठवण तलावाचे कोणतेही प्रकारे डागडुगी दुरुस्ती किंवा नवीन प्रकारचे कोणतेही बांधकाम अथवा भराव करण्यात येऊ नये. तसे झाल्यास यास नगर परिषदचे प्रशासन म्हणून आपण स्वतः मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी हे सर्वस्व जबाबदार राहतील असे दिलेल्या लिखित तक्रार निवेदनात म्हटले आहे. यावेळी नगर परिषदेला देण्यात आलेल्या निवेदनाप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , नगरसेवक तथा वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी डॉ. कुंदन फेगडे, भाजपाचे शहराध्यक्ष डॉ . निलेश गडे , भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळु फेगडे व अन्य पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. .