चौकशी समितीकडून रावेर बीडीओंना क्लिनचीट; ३४ गावांच्या ई-टेंडरमध्ये घोळ

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील बहुचर्चित दलित वस्ती योजनेच्या ३४ गावांच्या ७२ कामांमध्ये ई-टेंडर प्रक्रिया नियमानुसार झाली नसल्याचे मत जिल्हा परिषदच्या चौकशी समितीने व्यक्त केले आहे. यासाठी त्यांनी सरपंच व ग्रामसेवकांवर प्रशासकीय कार्यवाही करण्याचे मत नोंदविले आहे. तर रावेर बीडीओ यांनी निधी वर्ग करण्यात कोणतीही अनियमीतता केली नसून त्यांना क्लिन चिट दिली आहे.

जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनी कामांमध्ये ई-टेंडर व अनियमितता झाल्याची तक्रार होती. यावर जिल्हा परिषदेने एक चौकशी समिती नेमली होती.चौकशी होऊन महिनाच्या वर कालावधी उलटला अखेर आज संपूर्ण  प्रकरणाचा अहवाल बाहेर आला आहे.यात अनेक महत्वाचे ताशेरे चौकशी समितीने ओढले आहेत.

 

७२ कामांच्या ई-टेंडर मध्ये घोळ

दरम्यान दलित वस्ती योजनेच्या ३४ गावांच्या ७२ कामांची ई-टेंडर प्रक्रीया नियमानुसार झाली नसल्याचे मत चौकशी समितीने नोंदवीले आहे. तसेच ई-टेंडर नोटीसमध्ये अटी-शर्तीनुसार कागदपत्रे आढळुन आले नसल्याचे ताशेरे चौकशी समितीने नोंदविले आहे.यात फक्त कळमोदा ग्राम पंचायतीने नियमानुसार ई-टेंडर केले असल्याचे मत नोंदविले आहे.तसेच गौरखेडा येथील शौचालयाचे कामे जलसंपदा विभागाच्या जागेत केले असून टेंडरमध्ये देखिल घोळ झाल्याचे मत चौकशी समितीने नोंदविले आहे.

 

रावेर बीडीओं’ना क्लिनचीट

रावेर बीडीओ दिपाली कोतवाल यांनी दलित वस्ती योजनेच्या कामांचा निधी वर्ग करतांना कोणतीही अनियमीतता केली नसून सर्व काही नियमानुसार २५ टक्के रक्कम संयुक्त खात्यावर वर्ग केल्याचे मत चौकशी समितीने व्यक्त केल्याने त्यांच्यावर झालेल्या आरोपातुन त्यांना क्लिनचीट मिळाली आहे.

 

सरपंच ग्रामसेवकांवर कार्यवाहीची शिफारस

रावेर तालुक्यातील ३४ ग्राम पंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांवर प्रशासकिय कार्यवाही करण्याची शिफारस अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे या चौकशी समितीने केली आहे.

 

नंदकिशोर महाजनांच्या भूमिकेकडे लक्ष

दलित वस्ती योजनेच्या कामांमध्ये व टेंडर प्रक्रीयेत घोळ झाल्याची तक्रार करताच त्यांच्या विरुध्दात मोर्चा काढण्यात आला होता.तसेच त्यांच्या गटातील कामांची चौकशी करण्याची मागणी मोर्चेकरांनी केला होता.या सर्व प्रकरणाला राजकीय वळण देण्यात आले होते.आता सर्व काही चौकशी समितीतुन स्पष्ट झाले असून जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन या सर्व प्रकरणावर काय बोलतात त्यांच्या भूमिकेकडे माध्यमांचे लक्ष लागले आहे.

Protected Content