चोपडा प्रतिनिधी | चोपडा सहकारी साखर कारखाना अर्थात चोसाकाच्या भाडे तत्वावर देण्याचा मार्ग मोकळा झाला असून उद्या दिनांक ४ सप्टेबरपासून याच्या प्रक्रियेस प्रारंभ होणार असल्याची माहिती आज संचालकांतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
चोपडा सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यासाठी भागधारकांनी एकमुखाने परवानगी दिली होती. यानंतर सहकार खाते आणि साखर आयुक्तांची परवानगी मिळाल्याने आता चोसाकाची भाडे तत्वावर देण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. चोसाका चेअरमन अतुल पाटील यांनी चोसाका कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
याप्रसंगी अतुल पाटील म्हणाले की, निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी पुढील प्रमाणे वर्क ऑर्डर देण्यात आली असून ई निविदा प्रक्रिया कालावधी दि.४ सप्टेंबर ते दि.२० सप्टेंबर या कालावधीमध्ये वेबसाईटवर राहणार आहे. या प्रक्रियेमध्ये प्रीबीड मिटींग दि. १३ रोजी चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. यांच्या कार्यालयात होणार आहे तांत्रीक निविदा दि.२० रोजी अंतीम निविदा उघडण्याची कार्यवाही साखर आयुक्त यांचे कार्यालय पुणे येथे होणार आहे. यामुळे आता उद्यापासून चोसाका विक्रीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.
यावेळी पत्रकार परिषदेत व्हाईस चेअरमन शशी देवरे,संचालक प्रविण गुजराथी,आनंदराव रायसिंग, चंद्रशेखर पाटील,निलेश पाटील, सुनिल महाजन,अनिल बडगुजर, आत्माराम म्हाळके,विजय पाटील,सचिव पिंजारी साहेब उपस्थित होते.