चोरीची दुचाकी खरेदी करणाऱ्या तीन जणांना औरंगाबादेतून अटक; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । वाढत्या दुचाकीच्या चोरीच्या प्रकरणात काल एलसीबीने एका संशयिताला आठ दुचाकींसह अटक करण्यात यश आले होता. चोरीची दुचाकी खरेदी करणाऱ्या तीन जणांना औरंगाबादेतून अटक करण्यात आली आहे. चौघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनाविली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जमील अय्युब शेख (वय २४, रा. वाळुज एमआयडीसी, औरंगाबाद, मुळ रा. पिंपळगाव हरे, ता. पाचोरा) असे अटक केलेल्या दुचाकीचोराचे नाव आहे. जामनेर तालुक्यात दुचाकीचोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी कर्मचाऱ्यांना सुचना केल्या होत्या. दरम्यान, या परिसरात जमील नावाचा तरुण दुचाकी चोरुननंतर औरंगाबाद जिल्ह्यात विक्री करीत असल्याची गुप्त माहिती कर्मचारी विजय शामराव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, दादाभाऊ पाटील, विजय पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन व इशान तडवी यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने एका पंटरच्या माध्यमातून चोरीची दुचाकी खरेदी करण्याचा सापळा रचला. त्यानंतर जमील शेख याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. हा सर्व व्यवहार औरंगाबाद शहरात होणार असल्याने पथक रवाना झाले होते. यात सुनिल बल्लु पवार (वय-३०), समाधान रघुनाथ हुडेकर (वय-२२) आणि शेख शफिक शेख भैय्या (वय-३१) तिघे रा. जरंडी ता. सोयगाव जि. औरंगाबाद या तिघांनी कागदपत्र नसतांना दुचाकी विकत घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले. त्यांना देखील सहआरोपी करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, सचिन पाटील, योगेश बारी, मुकेश पाटील, चेतन सोनवणे यांनी तिघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

चारही आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्या. सुवर्णा कुलकर्णी यांनी १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे पिया मेढे यांनी कामकाज पाहिले. संशयित आरोपी जमील याच्यावर यापूर्वीच चार गुन्हे दाखल असून त्याच्याकडून अजून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Protected Content