नवी दिल्ली: वृत्तसंस्था । परदेशातूनही कोविशील्ड लसीची मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात आहे. आता पर्यंत सीरम इनस्टिट्यूट कोविशील्ड लसीचे ५० लाख डोस विविध देशांना दिले आहेत. कोरोना लसीच्या गुणवत्तेबाबत भारतीय लसींनी चीनच्या लसींना मागं टाकल्याचं चित्र आहे.
ब्राझील आणि कंबोडिया या देशांनी चीनकडून कोरोना लसीचे डोस घेतले होते. चीनच्या कोरोना लसीच्या परिणामकारतकेविषयी शंका निर्माण झाल्यानंतर दोन्ही देशांनी कोविशील्डकडला पसंती दिली आहे. सीरम इनस्टिट्यूटनं ब्राझीलला 20 लाख लसीचे डोस दिले आहेत.
ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसोनारो यांनी कोरोना विषाणू प्रतिरोधक कोविशील्ड लसीचे २० लाख डोस पुरवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ८ जानेवारीला बोलसोनारो यांनी कोरोना लसीचे डोस मिळण्यासाठी विनंती केली होती. येत्या आठवड्यात ब्राझीलमध्ये कोरोना लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे.
इडोनेशियाला कोरोना लसीकरणसाठी चीननं कोरोनावॅकचे तीस लाख डोस मिळाले होते. कोरोनावॅक चीननं विकसित केलेली आहे. चीनकडून लस उपलब्ध होऊनही इंडोनेशियाला कोविशील्ड लसीचे डोस हवे आहेत. इंडोनेशियाच्या सरकारची सीरम इनस्टिट्यूट सोबत चर्चा सुरु आहे.
कंबोडियाचे पंतप्रधान हून सेन यांनी भारतीय उच्चायुक्त देवयानी खोब्रागडे यांच्याशी कोरोना लस मिळण्यासाठी चर्चा केली. कंबोडियानं भारतात तयार झालेल्या कोविशील्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही लस उपलब्ध व्हावी असं म्हटलंय. चीनने कंबोडियाला सिनोवॅक वॅक्सिनच्या ५ लाख कोरोना लसींचे डोस दिले आहेत. कंबोडिया त्यांच्या देशातील १ कोटी ७० लाख जनेताला कोरोना लसीचे डोस देण्याच्या तयारीत आहे.
ब्राझीलमध्ये चीनमधून पुरवण्यात आलेल्या कोरोनावॅक लसीच्या परिणामकारतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. माडर्ना, फायझर आणि अॅस्ट्रोझेनका लसींच्या तुलनेत कोरोनावॅकची परिणामकारकता कमी आहे. कोरोनावॅकची इंडोनेशियामध्ये केलेल्या चाचणीमध्ये परिणामकारकता ६५ . ३ टक्के आढळली होती.