सासाराम: वृत्तसंस्था, । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार निवडणुकीतील एनडीएच्या प्रचारासाठी सासाराम येथे पहिली प्रचारसभा घेतली. मोदींनी राष्ट्रीय जनता दलावर नाराज मतदारांना एनडीएकडे खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्यावर टिप्पणी केली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामविलास पासवाल यांची प्रशंसा केली आणि श्रद्धांजली अर्पण केली. मात्र संपूर्ण भाषणात चिराग पासवान किंवा लोक जनशक्ती पक्षाबाबत काहीच म्हटले नाही चिराग पासवान यांच्याबाबत भारतीय जनता पक्षाची नेमकी काय भूमिका आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. संभ्रम कायम राहिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रघुवंशप्रसाद सिंह यांना देखील श्रद्धांजली अर्पण केली.पंतप्रधानांनी विशेषत: राष्ट्रीय जनता दलावर नाव न घेता निशाणा साधला. बिहारमध्ये सूर्य मावळण्याचा अर्थ होता सर्वकाही बंद होणे, सर्वकाही ठप्प पडणे हे बिहारचे लोक विसरू शकत नाहीत. आज बिहारमध्ये वीज आहे, रस्ते आहेत, महत्त्वाचे म्हणजे आज ती परिस्थिती आहे, ज्या परिस्थितीत सामान्य व्यक्ती निडरपणे राहू शकतो, ज्या लोकांनी सरकारी नियुक्तीसाठी बिहारच्या तरुणांकडून लाखोंची लाच खाल्ली, ते पुन्हा एकदा विकसित बिहारला लोभी नजरेने पाहत आहेत, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
आज बिहारमधील पिढी बदलली असली, तरी देखील बिहारला अडचणीत टाकणारे लोक कोण होते हे बिहारी तरुणांनी लक्षात ठेवायला पाहिजे, असे मोदी म्हणाले.