धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज दुपारी आणखी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये तीन धरणगाव शहरातील तर दोन धानोरे येथील आहेत.
धरणगाव शहरातील काही जणांचे स्वॅब ५ तारखेला घेण्यात आले होते. यापैकी तिघांचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. तर धानोरे गावातील आणखी दोन जण पॉझिटिव्ह आले आहेत. या वृत्तास आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश चौधरी यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा शहरातील बालाजी गल्ली परिसरातील आणखी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. प्रशासनाने आधीच रुग्णांचा रहिवास असलेला परिसर सील केला आहे. तालुक्यातील रुग्णसंख्या आता झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता धरणगाव शहरात रविवार दिनांक ७ जूनपासून पाच दिवसांचा स्वयंस्फुर्त जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून नागरिकांना याचे पालन करण्याचे आवाहन प्रशासन व व्यापारी महामंडळाने केले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.