पुणे (वृत्तसंस्था) पुण्यात आज अवघ्या काही तासांमध्ये चार करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. हे सर्व ससून रुग्णालयात उपचार घेत होते. मृतांची संख्या आता ३८ झाली आहे.
आज पुण्यात ४ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचीही नोंद झाली आहे. विशेष म्हणजे पुण्यात एका प्रसूतिगृहामध्ये उपचारादरम्यान एका गरोदर महिलेलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. प्रसूतिगृहामध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या गरोदर महिलेला कोरोना संक्रमण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर तिच्यावर उपचार करणाऱ्या २ डॉक्टरांसह ५ ते ६ नर्स यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच संपूर्ण रुग्णालयात खबरदारी बाळगण्यात येत आहे. कोंढव्यातील ५० वर्षीय महिलेवर ससूनमध्ये उपचार सुरू होते. तिला रक्तदाबाचा त्रास होता. तिला करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. तर पर्वती दर्शन येथील २७ वर्षीय तरुणाला करोनाची बाधा झाली होती. १२ एप्रिलला त्याला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. तो मद्याचे अतिसेवन करत होता. यात त्याचे यकृत निकामी झाले होते. त्याचाही आज मृत्यू झाला. दरम्यान, महाराष्ट्रात २४५५ रुग्ण आढळले आहेत. तर आत्तापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाला आहे.