चाळीसगाव शहरात जनता कर्फ्यू शंभर टक्के यशस्वी

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । सध्या देशभर थैमान घालीत असलेल्या कोरोना व्हायरस बरोबर लढण्यासाठी व चाळीसगाव तालुक्यात या व्हायरसचा शिरकाव होऊ नये यासतर्कतेसाठी चाळीसगाव तालुक्यात दि. १ ते ३ मे तीन दिवशीय जनता कर्फ्यू लागू करण्यात  आला असून नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

चाळीसगाव शहरातील ‘रहा अपडेट कोवीड १९’ या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात दिनांक १ ते ३ मे या कालावधीत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लागू करावा अशी संकल्पना मांडण्यात आली होती. या संकल्पनेस चाळीसगाव तालुक्यातील प्रशासनातील सर्व अधिकारी तसेच आमदार मंगेश चव्हाण, खासदार उमेश पाटील, तालुक्यातील सर्व संघटना सामाजिक संस्था यांचे पदाधिकारी आणि किराणा व्यापारी असोशियन, मेडिकल व्यापारी असोशियन, फर्टीलायझर व्यापारी असोशियन, वैद्यकीय असोशियन, भाजीपाला व्यापारी यांच्या संयुक्त बैठकीत हा जनता कर्फ्यू राबवण्याचे एक मताने ठरविण्यात आले होते. त्यानंतर चाळीसगाव तालुक्यात जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन सर्व पक्ष संघटना व्यापारी यांनी केले होते. त्यानुसार आज संपूर्ण चाळीसगाव शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत असून शहरातील सर्व रस्ते ओस पडलेले आहेत. शहरात ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस बांधवांच्या मदतीला माजी सैनिक देखील आता पुढे आले आहेत. या बंद काळात नेमणुकीस असलेल्या बंदोबस्तावरील बांधवांना एनर्जी ड्रिंक पुरवण्याचे काम मेडीकल असोशियन व फर्टिलायझर असोशियन यांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात केले आहे. हा उपक्रम राबवून बंदोबस्तावर असलेल्या पोलिस बांधवांचे एक प्रकारे त्यांनी आभार देखील मानले आहेत. चाळीसगावकरांनी हा जनता कर्फ्यू सतत तीन दिवस कडकडीत पाळण्याचे ठरविल्याने आजूबाजूच्या भागात म्हणजेच मालेगाव, धुळे, औरंगाबाद येथे थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसला काही प्रमाणात चाळीसगाव तालुक्यात शिरकाव करण्यापासून रोखण्यात मदत होईल अशी अपेक्षा सर्व यंत्रणेला आहे.

Protected Content