चाळीसगाव, प्रतिनिधी । येथे आज नव्याने सहा रुग्णांचा तपासणी रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, हा तालुका कोरोनामुक्त म्हणून घोषित करण्यात आला होता.
शहरातील गोपाळपुरा भागातील वृद्ध काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने त्यांचे संपर्कात आलेल्या आठ जणांना कॉरंटाईन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवले असता त्यापैकी सहा लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याचे चाळीसगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाविस्कर यांनी सांगितले आहे. चौधरीवाडा, गोपाळपुरा भागातील हे सहा रुग्ण असल्याने या संपूर्ण परिसरात भीतीचे आणि काळजीचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या आठवड्यात चाळीसगाव कोरोना मुक्त झाल्याने संपूर्ण चाळीसगाव तालुक्याने सुटकेचा निश्वास सोडून आनंद व्यक्त केला होता. मात्र, आज सापडलेल्या या रुग्णांमुळे पुन्हा चाळीसगावकरांच्या चिंतेत वाढ झाली असून प्रशासनाला आता पुन्हा युद्धपातळीवर काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच चाळीसगावकर नागरिकांनीदेखील काळजी घेऊन जास्तीची गर्दी टाळणे गरजेचे असल्याचे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वीच्या एका रुग्णांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला असून रुग्णांची संख्या सात झाली आहे.