चालू वर्षात वृद्धीदराचा वेग संथच – शक्तिकांत दास

नवी दिल्ली वृत्तसंस्था । अनलॉकअंतर्गत निर्बंध शिथिल करून बाजारपेठ पूर्ववत करण्याचे प्रयत्न सरकार करत आहे. मात्र त्याचवेळी कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे चालू वर्षात वृद्धीदराचा वेग संथच राहील, तथापि विकासाला चालना देण्याबरोबरच बाजारात रोकड तरलता कायम ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक कटिबद्ध आहेअसे मत रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले. उद्योगांची शिखर संघटना फिक्कीने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये त्यांनी मते मांडली.

पहिल्या तिमाहीत विकासदर उणे २३.९ टक्के इतका प्रचंड खाली घसरला होता. ‘जीडीपी’ची आकडेवारी कोरोना नुकसनीचे प्रतिबिंब आहे, केंद्र सरकारने सुरुवातीला देशभर कठोर टाळेबंदी लागू केली होती. त्यामुळे जीडीपीमध्ये मोठी घसरण अपेक्षित होती, संकट अद्याप कमी झालेले नाही. मात्र यात जागतिक बाजारपेठेत संधी देखील आहे. त्याचा फायदा देशातील कंपन्यांनी घ्यायला हवा. जागतिक दर्जाची उत्पादने तयार करून कंपन्यांनी निर्यातीतील संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दास यांनी यावेळी केले. संकटात सर्व प्रकारचे आव्हान स्वीकारण्यास सज्ज आहोत, अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. भांडवली आणि वित्तीय बाजारपेठेतील घडामोडींवर रिझर्व्ह बँक लक्ष ठेवून आहे, असे त्यांनी सांगितले.

एडीबीने पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे वाटचाल करेल, असेही आपल्या एशियन डेव्हलपमेंट आऊटलुक या अहवालात नमूद केले आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जीडीपी सध्याच्या पातळीपेक्षा ८ टक्क्यांनी वाढेल. माणसांचे चलनवलन आणि व्यावसायिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे जीडीपी वाढण्यास मदत मिळणार आहे.

Protected Content