चार वर्षे पूर्ण झाल्यानंतरही नोटबंदीवर राहुल गांधी यांचे प्रश्नचिन्ह

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नोटाबंदीला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि भारतीय अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीबाबतही सांगितलं.

आज नोटाबंदीला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. काळ्या पैशाविरोधात कारवाईची घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता नोटाबंदीची घोषणा केली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारच्या या निर्णयाचा सातत्यानं विरोध केला आहे.

राहुल गांधी यांनी व्हिडीओ ट्वीट केला आहे. “नोटाबंदी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारपूर्वक उचललेलं एक पाऊल होतं. जेणेकरून सामान्य जनतेच्या पैशांनी मोंदींचे मित्र उद्योगपती यांची लोखो कोट्यवधी रूपयांची कर्ज माफ केली जावी. हे चुकून झालं आहे असं समजू नका, हे जाणूनबुजून करण्यात आलं आहे. राष्ट्रीय त्रासाच्या चार वर्षांसाठी तुम्हीही आवाज उठवला पाहिजे,” असंही राहुल गांधी म्हणाले.

“आज भारतासमोर मोठं संकट आहे. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. प्रश्न हा आहे की बांगलादेशची अर्थव्यवस्था भारताच्या पुढे कशी गेली. एक अशी वेळ होती जेव्हा भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वोत्तम अर्थव्यवस्था होती. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याचं कारण कोरोना असल्याचं सरकारकडून सांगितलं जातं. परंतु प्रादुर्भाव बांगलादेशमध्येही आहे. इतर देशांमध्येही आहे. मग भारतच यात मागे कसा राहिला?” असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला.

Protected Content